अनारी गाव रमलंय मुंबई ठाणेच्या फूल बाजारात
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेले, केवळ दीड हजार लोकसंख्या असलेले ‘अनारी’ हे गाव मुंबईच्या फूल बाजारात रमले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘फुलवाल्यांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांत फुलांच्या व्यवसायात भक्कम पाय रोवून बसलेल्या अनारीकरांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठा आर्थिक हातभार लागतो आहे. या अर्थक्रांतीमुळे गावाला उभारी मिळाली आहे.
गावाचा पारंपरिक व्यवसाय भातशेती असला, तरी गेल्या अडीचशे वर्षांपासून अनारीकरांचे उपजीविकेचे खरे साधन म्हणजे फुलांचा व्यवसाय. या व्यवसायाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे गावातील एका ग्रामस्थाने केली होती. ज्यातून फुले मुंबई बाजारात पोहोचू लागली आणि अनारीकरांच्या मेहनतीने ही उद्योगसाखळी वाढत गेली. आजच्या घडीला मुंबईतील ताडदेव, धोबी तलाव, कुलाबा, दादर, ग्रँट रोड, नाना चौक, माहीम, माटुंग, बोरिवली ते नालासोपारा, वसई-विरार, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, भाईंदर अशा बर्याच भागांत अनारीचे सुमारे 300 हून अधिक ग्रामस्थ फुलांच्या व्यवसायात कार्यरत आहेत. गावातील जवळपास प्रत्येक कुटुंबाचा फुल उद्योगाशी थेट संबंध असून, 70 टक्क्यांहून अधिक मुंबईतील अनारीकर हे या व्यवसायाशी निगडित आहेत.
गुलाब, गुलछडी, कागडा, नेव्हाळी, जुई, मोगरा, अष्टर, गोंडा, सायली, कन्हेर, तगर, शेवंती, लिली, ऑर्चीट, अंक्युरियन, जरबेरा अशा विविध प्रकारच्या फुलांची खरेदी मुंबईतील भुलेश्वर, दादर, एल्फिन्स्टन मार्केटमधून होते. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम, मंदिर सजावट ते घरगुती डेकोरेशनपर्यंत सर्वच ठिकाणी अनारीकरांची सजावट कौशल्य गाजते.
एक दुकान मालकाव्यतिरिक्त किमान 4 गावकर्यांना रोजगार देते, अशी या व्यवसायाची ताकद आहे. अंदाजे 8 लाख रुपये वार्षिक उलाढाल एका दुकानाची असून, एकूण गावाची उलाढाल 15 ते 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. हा महसूल केवळ मुंबईतच नव्हे, तर चिपळूण, पिंपळी, शिरगाव, अलोरे, खेर्डी, सावर्डे परिसरात सुरू झालेल्या नव्या दुकानांमुळे आणखी वाढत आहे. सध्या या नव्या उपक्रमातून अनारी गावातील स्थानिक 50 तरुणांना रोजगार मिळाला असून, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी येथेही विस्ताराचे नियोजन आहे. या उद्योगात दिवसाची सुरुवात रोज पहाटे 3 वाजता होते आणि काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहते. यातून समाधान, सन्मान आणि स्थैर्य या गावातील व्यवसाय करणार्यांना मिळते. भविष्यात महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय विस्तारासोबतच गावातच फुलशेती सुरू करण्याचा विचारही सुरू आहे, ज्यामुळे कच्च्या मालासाठी बाहेरील बाजारांवरील अवलंबित्व कमी होईल.

