

देवरुख : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर म्हैस घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीचा पाठलाग करून आठ दरोडेखोरांनी बोलेरो चालकाला अडवत हत्याराचा धाक दाखवून गाडीतील 25 हजार रुपये काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे. या लूटमारप्रकरणी पाचजणांना दोन तासांतच पकडण्यात देवरुख पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी) हे 8 एप्रिल रोजी बोलेरो गाडीमध्ये वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून सायंकाळी 6.30 च्या सुमारास एक म्हैस घेऊन शिराळा-सांगली येथे घेऊन जात होते. ते आंबा घाट दख्खन येथे आले असता थार गाडी (एमएच 08-2767) व भारत सरकार असा स्टिकर असलेली इनोव्हा (एमएच 08-2099) मध्ये आलेल्या 8 अनोळखी व्यक्तींनी दळवी यांच्या गाडीच्या पुढे व मागे लावून फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले व मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यांच्या गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले 25 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत फिर्यादी प्रथमेश दळवी यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी फरहान रशिद मुल्ला (42, रा. कोकणनगर, ता. रत्नागिरी), प्रथमेश सचिन भाटकर (24, रा. गोळप, ता. रत्नागिरी), सर्वेश सुभाष कीर (22, रा. सोमेश्वर कीरबाग, ता. रत्नागिरी), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (26, रा. कुवारबाव रत्नागिरी), भूषण विपेंद्र सावंत (26, रा. मिऱ्या, ता. रत्नागिरी) या पाचजणांना तत्काळ अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.