Ratnagiri News : आंबा घाट बंद; एसटीची चाके अणुस्कुरा घाटाकडे!

दरड कोसळल्याने पुढील आदेशापर्यंत वाहतूक बंद; रत्नागिरी-कोल्हापूर फेऱ्यांचे अंतर ४२ कि.मी.ने वाढणार
Amba Ghat
आंबा घाट बंदFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळल्याने पुढील आदेशापर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या आता लांजा-वाटूळ-ओणी-पाचल-अणुस्कुरा-मलकापूर- कोल्हापूर या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.

मंगळवारपासून या मार्गावर एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आंबा घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीमुळे घाटातील रस्ता खचून त्याला भेगा पडल्या असून, त्यातच दरड कोसळल्याने वाहतुकीचा धोका वाढला आहे. यापूर्वी घाटातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती; मात्र एसटी बसेसची वाहतूक सुरू होती. आता परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजित जानराव यांनी आगार व्यवस्थापकांना एसटी बस फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. आंबा घाटाऐवजी अणुस्कुरा घाटमार्गे फेऱ्या चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवास ४२ कि.मी.ने वाढणार

पर्यायी मार्गामुळे रत्नागिरी-कोल्हापूर एसटी प्रवासाचे अंतर प्रतिफेरी सुमारे ४२ कि.मी.ने वाढणार आहे. परिणामी, प्रवाशांच्या तिकिटाच्या दरातही सात टप्प्यांनी वाढ होणार आहे. आगारांना अणुस्कुरा-मलकापूर मार्गाचे सुधारित टप्पा पत्रक उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यानुसार फेऱ्यांमध्ये बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आंबा घाटातील परिस्थितीची यापूर्वी लांजा-राजापूरचे आमदार किरण भय्या सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि पोलिस अधीक्षकांनी पाहणी केली होती. घाटातील रस्त्याला पडलेल्या भेगा आणि पावसामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. कोल्हापूर परिवहन विभागाने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आंबा घाटाचा रस्ता बंद केला आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार मंगळवारपासून एसटी बसेस अणुस्कुरा घाटमार्गे धावत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविले आहे. रत्नागिरी-कोल्हापूरचे अंतर वाढल्याने तिकीट दरातही वाढ होणार आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
आश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news