

चिपळूण शहर : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अलोरे शिरगाव पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, अलोरे शिरगाव पोलिसांनी पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे छापा टाकून एका व्यक्तीस 14 हजार रुपयांच्या गांजासह अटक केली आहे.
27 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ एक पथक तयार केले. दोन पंचांच्या उपस्थितीत सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, संजय राया खरात (39, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी, ता. चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 588 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 14 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात संजय खरात याच्याविरोधात गुन्हा रजि. नं. 46/2025 अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर आळा बसण्यास मदत होणार आहे.