निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा
चिपळूण :आपण युतीमध्ये असलो, तरीही याआधीच्या अनुभवानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या की महायुतीत लढायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्ह्याला देण्यात येईल. तशी मुभा स्थानिक पदाधिकार्यांना असेल. आपल्याला राष्ट्रवादी संघटना वाढवायची आहे आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून यायचे आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची तयारी ठेवा, असा सूचक इशारा कार्यकर्त्यांना दिला. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार 27 रोजी जिल्हा दौर्यावर होते. दुपारी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा संवाद मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर आ. शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, प्रत्येका आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. गेली तीन वर्षे प्रत्येक कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट बघत आहे. कुणाला नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, पं. स., जि. प. सदस्य व्हायचे आहे. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. असे असले तरी सर्वांनी पक्षीय संघटना मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कानदेखील टोचले. ते म्हणाले कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी करावी. कारण उद्याच्या निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर निवडून यायचे आहे. त्यातूनच नवीन लोक पुढे येणार आहेत. संघटना वाढवायची असेल तर कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असतो. तो सक्षम असला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आपल्या जिल्ह्यात, राज्यात, गावात, वाडीत, भावकीत सक्षमपणे कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चौकाचौकात राष्ट्रवादीचा फलक, ध्वज लागला पाहिजे. जिल्हाध्यक्षांसहीत आमदार, पदाधिकार्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पक्षाचा पुरोगामी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढवायाचा असून त्यासाठी सभासद नोंदणी हा कार्यक्रम घ्या. आ. शेखर निकम यांनी आपल्याला रत्नागिरी दौर्यात संघटनेसाठी वेळ द्या, अशी विनंती केली होती. म्हणून आज आपण वेळ दिला आहे. आता कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. तरी सर्वांनी सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवा, अशी विनंती अजित पवार यांनी यावेळी केली.
राज्य शासनामार्फत आपण चांगले काम करत आहोत. लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे या योजनेचे अनुदान आम्ही कधीही थांबवणार नाही. ही योजना कायम सुरूच राहील. या बाबत विरोधक गैरसमज पसरवत असतात. मात्र, ही योजना सुरुच ठेवणार. मात्र, एकावेळी महिलेला एकाच योजनेचा लाभ घेता येईल. या शिवाय अडीच लाखांवर उत्पन्न असणार्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आपल्याला पाणी वाचवायचे आहे, कमित कमी कीटकनाशक, खताचा वापर करायचा आहे. त्यासाठी ए. आय. तंत्रज्ञान आले आहे. शेतकर्यांनी नवे तंत्रज्ञान शिकले पाहिजे. एकेकाळी येथील माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांनी राष्ट्रवादी पक्ष उभारण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे काम विसरता येणार नाही, असा आवर्जुन उल्लेख अजित पवार यांनी केला.
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ते म्हणाले, राज्य सरकार केंद्र शासनाच्या खंबीरपणे पाठीशी आहे. या हल्ल्याविरोधात केंद्र सरकार सडेतोड उत्तर देईल, असा आमचा विश्वास आहे. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सारेजण भारतीय आहोत. डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे आज देश एकसंध आहे.
अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये फेरबदलाचे संकेत
आता आपण सत्तेत आहोत. आपल्यासमोर पुढची पाच वर्षे आहेत. आपण या आधीच सांगितले आहे. या पुढच्या काळात नवीन लोकांना संधी देईन. आपण नव्या 10 लोकांना विधानसभेच्या उपाध्यक्षांसह संधी दिली आहे. पहिल्या अडीच वर्षांत 10 लोकांना तर पुढच्या अडीच वर्षांत काही राहिलेला लोकांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्या पद्धतीने विचार होईल. त्यासाठी जास्तीत जास्त पक्ष वाढवायला हवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, या वेळेच्या महायुतीच्या सत्तेत असताना काही लोकांना संधी दिली. काहीवेळा वरिष्ठांना थांबवून लोकसभा किंवा देशपातळीवरील संधी द्यावी लागते. अशी प्रक्रिया सर्वत्रच सातत्याने सुरू असते. फक्त राष्ट्रवादी संघटना मजबूत करा. जिल्ह्यात पाचपैकी एक जागा आपल्याला मिळाली. गुहागरची जागा तशी आपली होती, हे जिल्हाध्यक्षांना माहिती आहेच. पण झालं गेलं विसरून जायचं असतं. त्या खोलात जाणार नाही. नवीन वाट, नवीन सुरुवात अशा पद्धतीने अजित पवार यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
1 मे रोजी मंगल कलश पूजन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 मे रोजी मंगल अमृत कलशचे पूजन होणार आहे. मुंबईमध्ये हा कार्यक्रम होईल. सलग तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळे थोर पुरुषांच्या जन्मभूमी, कर्मभूमीत जाऊन तेथील माती कलशामधून आणण्यात येईल, तर महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे जलकुंभदेखील आणण्यात येईल आणि त्यांचे एकत्रित पूजन होईल. या कार्यक्रमाला राज्यभरातील कार्यकर्त्यांनी अवश्य यावे, असे आवाहन यावेळी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

