छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार; कसबा-संगमेश्वर येथील नियोजित कामांची पाहणी
Chhatrapati Sambhaji Maharaj memorial
संगमेश्वर : कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सांमत, मंत्री अदिती तटकरे, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने.pudhari photo
Published on
Updated on

संगमेश्वर : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. स्मारकाला भव्यता आणण्यासाठी पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अन्य मोठ्या प्रकल्पांचा अभ्यास करून सूचना सादर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदिराला भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन, संवर्धन आणि परिसर विकास संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम,माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेश्वर, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी स्मारक परिसराची पाहणी केली. तसेच सरदेसाई वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालय, बंधारा, व्हीगॅलरी, जुन्या मंदिरांचे जतन आदी विषयांवर आर्किटेक्ट्ससोबत चर्चा केली.

कर्णेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी स्मारक जतन, संवर्धन आणि परिसर विकास बैठकीत आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीला काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेश्वर यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन, संवर्धन आणि परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. हे स्मारक भव्यदिव्य करण्यासाठी पुरातत्त्व आणि बांधकाम विभागाने देशभरातील अन्य मोठ्या प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि याबाबत सूचना द्याव्यात, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. याच संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील अभियंता शेखर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

कर्णेश्वर मंदिर हे प्राचीन असून मंदिराचे बांधकाम उच्च प्रतीचे आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जाईल, याची काळजी घ्यावी. महाराजांच्या स्मारकाच्या पाच एकर परिसरातील नदीकाठच्या मंदिरांचे जतन केले जाणार आहे. स्मारकासाठी भरघोस निधी दिला जाईल. स्मारक उभारताना ऐतिहासिक वारसा जतन करून येथील हवामानाला अनुरूप टिकाऊ बांधकाम केले जाईल. स्थानिक पातळीवरील नकाशे व इतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून माहिती सादर करावी. येत्या पावसाळी अधिवेशनात स्मारकाच्या निधीला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

धमाशांमुळे कार्यकर्त्यांची तारांबळ

आज कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात अजितदादा पवार यांनी भेट दिली. त्यांचा नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर गणेश मंदिर येथील संगमावर काही लोक पोहोचले होते. त्यावेळी मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या सायरनच्या आवाजामुळे तिथे असलेले मधमाशीचे पोळे अचानक उठले. पोळ्यातील माशा उठल्याने घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news