

दोडामार्ग : तालुक्यात गेली अनेक वर्षे हैदेस घालणाऱ्या वन्य हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाबरोबर हतीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व न्यायलयात जावे यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतने हत्ती बंदोबस्ताचा ठराव घेऊन न्यायालयात रीट पिटीशन दाखल करावी, अशी सूचना आ. केसरकर यांच्याकडून करण्यात आली. तसेच आजरा किंवा तिलारी येथे हत्तीग्राम उभारण्या संदर्भात आपली वनमंत्र्यासोबत बैठक होणार असून याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे आ. केसरकर म्हणाले.
हत्ती बंदोबस्त व नुकसानी संदर्भात एक बैठक झाली. या बैठकीला आ. दीपक केसरकर, जिल्हा उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा, सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे, पं. स. उपसभापती गणेशप्रसाद गवस, पं. स. सदस्य सायली निंबाळकर, दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस आदी उपस्थित होते.
शेती बागायतीची नुकसान आम्ही का सोसावी ?
शेतकरी पंकज गवस म्हणले, गेली २२ वर्षे आम्ही हेच ऐकतोय की असं करणार, तस करणार, मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. माझ्या बागायतीतील साधारण ४० नारळाची झाडे हत्तींनी उडविली. ती झाडे पुन्हा लावणे मला शक्य नाही, मग मी ही नुकसानी का सोसावी? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावेळी आ. केसरकर यांनी शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी वनविभागाने हातभार लावावा अशा सूचना दिल्या. उपसभापती गवस यांनी झाडे जमीनदोस्त हत्तीनी केली की त्याची नोंद ७/१२ वर तशीच असते ती कमी केली जातं नाही, ती नोंद कमी केली तर शेतकऱ्यांना वनविभागाच्या योजनेतून झाडे लाण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते, याकडे लक्ष वेधले.