

चिपळूण : यंदाचे वर्ष हे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे 1 जानेवारीनंतरची वर्तमानपत्रे काढून बघा. त्यामध्ये तुम्हाला अनेक अभ्यासपूर्ण लेख मिळतील. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, हे एक नवे तंत्र आहे. या तंत्राचा उपयोग करून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे, असे उद्गार देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. चिपळूण येथे सुरू झालेल्या वाशिष्ठी डेअरी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याचवेळी त्यांच्या हस्ते चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना ‘पुढारी आयकॉन’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय याविषयी आपले मत मांडले.
शहरातील स्वा. वि. दा. सावरकर मैदानात दि. 5 ते 9 जानेवारीदरम्यान कृषी महोत्सव भरवला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, आ. भास्कर जाधव, हेमंत टकले, माजी आ. रमेश कदम, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, वाशिष्ठी मिल्कचे अध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सुरेश बने आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी प्रदर्शन उद्घाटनपर कार्यक्रमात ‘पुढारी’च्या 86 व्या वर्धापनदिनी चिपळूण नागरीचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना पुढारी आयकॉन पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ठाणे येथील पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे रविवारी या कार्यक्रमात त्यांना ‘पुढारी आयकॉन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने ए. आय. महाक्रांती या विषयावर सातत्याने पुढारीच्या माध्यमातून विशेषांक प्रकाशित होत आहेत. याच अनुषंगाने शरद पवार यांनी याचा आढावा घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता एक नवे तंत्र आहे. भविष्यात हे तंत्र वापरून काय होऊ शकते? विविध क्षेत्रांमध्ये ए. आय.मुळे कसे बदल होतील, याचे अभ्यासपूर्ण लेख येत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर देशभरात हे लेख प्रसारित होत आहेत. कृषी क्षेत्रातदेखील हे नवे तंत्र येत आहे आणि कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे. ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ए. आय. तंत्र वापरल्यास त्याचे उत्पादन दुप्पट होईल आणि उत्पादन वाढल्यानंतर साखरेचे उत्पादन देखील वाढेल, असा प्रयोग देशभरात होत आहे. महाराष्ट्रात देखील ते सुरू आहे. या प्रसंगी ‘पुढारी’चे उत्तर रत्नागिरी विभागप्रमुख समीर जाधव, वितरण प्रमुख अजित लांजेकर, पत्रकार सुनील दाभोळे, वसुली प्रतिनिधी अभिजीत बुरटे, रोहित शेट्ये उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.
आपण पुढील महिन्यात पुणे, सोलापूर, सातारा अशा तीन जिल्ह्यातील शेतकर्यांना एकत्र करून कृषी क्षेत्रातील ए. आय. बाबत प्रयोग केले आहेत आणि त्या प्रयोगांचे प्रदर्शन लवकरच बारामती येथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात बदल होत आहेत. हा बदल क्रांतिकारक ठरेल, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.