

भालचंद्र नाचणकर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील 4 नगरपरिषदा आणि 3 नगरपचांयतींची निवडणूक ऐतिहासीक ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या तिजोरीच्या चाव्या येत्या सोमवारपासून लोकप्रतिनीधींच्या हातात येणार आहेत. रत्नागिरी, राजापूर, चिपळुण, खेड नगरपरिषदांवर डिसेंबर 2021 पासून तर गुहागर, देवरुख नगरपंचायतींवर मे 2023 मध्ये प्रशासक आले होते. लांजा नगर पंचायतीवर फेब्रुवारी 2025 मध्ये प्रशासक आले. प्रशासक आल्यानंतर तिजोरीच्या चाव्या प्रशासकांच्या ताब्यात गेल्या होत्या.
या सातही नगर परिषद, नगर पंचायतींचे बजेट 582 कोटींचे होते. हे बजेट आता आणखी वाढणार आहे. जिल्हयातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्धारीत 5 वर्षांनंतर होवू शकल्या नाहीत. त्यामुळे नुकताच झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ऐतिहासीकच मानल्या जात आहेत. जिल्हयातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड, गुहागर, देवरुख, लांजा या 7 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर सर्व प्रकारची कामे आणि खर्च करण्याचे अधिकार प्रशासकांकडे होते.
नगराध्यक्षांची सहयांची भुमिका साकारणारे प्रशासक एक प्रकारे त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तिजोरीच संभाळत होते. यामध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे अंदाजपत्रक तब्बल 220 कोटी रुपयांचे आहे. पाठोपाठ चिपळुण 164 कोटी. खेड 95 कोटी, राजापुर 12 कोटी, लांजा 34 कोटी, देवरुख 43 कोटी तर गुहागर नगरपंचायतीचे बजेट 14 कोटी रुपयांचे होते. ही 582 कोटी रुपयांच्या तिजोरीच्या चाव्या आता नुतन नगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवकांच्या ताब्यात येणार आहे.
रत्नागिरी नगर परिषद (ब वर्ग ), राजापुर (क वर्ग ), चिपळुण (ब वर्ग ) नगर परिषदा 1876 साली तर खेड (क वर्ग ) नगर परिषद 1940 साली स्थापन झाल्या आहेत. गुहागर, देवरुख, लांजा या क वर्गातील नगर पंचायती आहेत. रत्नागिरी न.प.चे कार्यक्षेत्र 10.49 चौरस कि.मीचे आहे. राजापूर न. प कार्यक्षेत्र 6.19, चिपळुण न. प कार्यक्षेत्र 14.9, खेड 2.1 , गुहागर 18.47, देवरुख 21.14 आणि लांजा नगर पंचायतीचे कार्यक्षेत्र 35.13 चौ कि.मी इतके आहे.
प्रशासक येण्यापुर्वी रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेचे 18, भाजपाचे 6, राष्टवादीचे 5 आणि 2 अपक्ष नगरसेवक होते. राजापुरात काँग्रेस 8, भाजप 1, शिवसेना 8 आणि राष्टवादीचा 1 नगरसेवक होता. चिपळुणमध्ये भाजपाचे 5, काँग्रसचे 5, राष्टवादीचे 4 , शिवसेना 11 आणि अपक्ष 2 नगर सेवक होते. खेड नगरपरिषदेमध्ये शिवसेना 10, अपक्ष 1 आणि खेड शहरविकास आघाडीचे 7 नगरसेवक होते. गुहागरमध्ये गुहागर शहरविकास आघाडीचे 10, भाजपाचे 6, राष्टवादी आणि अपक्ष प्रत्येकी 1 नगरसेवक होते. देवरुख मध्ये देवरुख शहर विकास आघाडीचे 5, भाजपा 9 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक होते. लांजा नगर पंचायतीत शिवसेना शहरविकास आघाडीचे 15 आणि भाजपाच्या उर्वरित नगर सेवकांकडे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीच्या चाव्या होत्या.
दापोली, मंडणगड न.पं. मुदत फेब्रुवारी 2027 साली संपणार
रत्नागिरी जिल्हयामध्ये 4 नगर परिषदा आणि 5 नगरपंचायती आहेत. त्यातील दापोली आणि मंडणगड वगळता इतर 7 स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वत्रिक निवडणुक झाली आहे. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या नगरसेवकांची मुदत 10 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार आहे. दापोली नगरपंचायतीचे बजेट 27 कोटीचे तर मंडणगड नगरपंचायतीचे गेल्या वर्षीचे बजेट 9 कोटीचे होते.