Ratnagiri News : अवैध मासेमारी नौकांवर कारवाई करणार

सहायक मत्‍स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांचे पारंपरिक मच्छीमारांना आश्‍वासन
Illegal fishing
अवैध मासेमारी
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : रत्‍नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर पूर्ण क्षमतेने कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन सहायक मत्‍स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी पारंपरिक मच्छीमारांना दिले.

रत्‍नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई सुरु झाल्याने पारंपरिक मच्छीमारांनी सहाय्यक मत्‍स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांचे अभिनंदन करतानाच परवाना नसलेल्या मिनी पर्ससिन नौका धुमाकूळ घालत असून एक्सेस पास असलेल्या पर्ससिन नौका १२ नॉटिकल मैलाच्या आत समुद्रात बेकायदेशिरपणे मासेमारी होउ नये, ड्रोन कधी आणि कुठे उडणार आहेत याची नौका मालकांना माहिती मिळू नये याची अधिक दक्षता घ्यावी, अशी विनंती पारंपरिक शाश्वत मच्छीमार हक्क समितीचे अध्यक्ष रणजित उर्फ छोटू भाटकर यांनी केली. यावर सावंत यांनी वरील आश्‍वासन दिले.

सहायक मस्त्‍य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून काही दिवसांपूर्वी ४ आणि बुधवारी ३ अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली. पारंपरिक मासेमारीला पोषक असलेल्या या कारवाईमुळे पारंपरिक मच्छीमार नेते छोटू भाटकर यांच्या नेतृत्‍वाखाली अनेक मच्छीमारांनी गुरुवारी सहायक मस्त्‍य व्यवसाय आयुक्त सावंत यांची भेट घेउन अभिनंदन केले. त्‍याचवेळी कशाप्रकारे अवैध मासेमारी होऊ शकते, याची माहिती देऊन आणखी जोमाने कारवाईची मागणी केली.

एक्सेस पास असलेल्या पर्ससिन नेट नौकांना केंद्र शासनाच्या अखत्‍यारीतील म्हणजेच १२ नॉटिकल मैल बाहेरच्या समुद्रात मासेमारी करायची आहे; परंतु अनेक पर्ससिन नेट नौका राज्याच्या सागरी क्षेत्रात म्हणजेच १२ नॉटिकल मैलाच्या आत मासेमारी करतात. मिनी पर्ससिन नेट नौका तर ८ ते १० वावात मासेमारी करत आहेत. मिनी पर्ससिन नेट नौकांना मासेमारीचा परवानाच नाही. अशा मिनी पर्ससिन नौकांवर कारवाईसाठी गस्तीला जाताना आम्ही आमची नौका देऊ असे आश्वासन पारंपरिक मच्छीमार नेते छोटू भाटकर यांनी दिेले.

ड्रोन कोणत्‍या समुद्र किनाऱ्यावर कधी आणि कुठे उडणार आहे याची माहिती नौका मालकांना मिळणार नाही याची यापुढेही दक्षता घेण्याची विनंती यावेळी करण्‍यात आली. यावेळी रोहिदास पारकर, पिंकू बिर्जे, शंकर शिवलकर, विनायक मयेकर, दत्तगुरु कीर यांच्यासह अनेक पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news