

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिला गणवेश वेळेत मिळाला आहे. सुमारे 90 टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले आहे. उर्वरित गणवेशाचे वितरण दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल. दुसरा गणवेश 15 ऑगस्टपर्यंत देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. मात्र या गणवेशासाठी शासनाकडून अजून निधीच प्राप्त झालेला नाही. निधी आल्यानंतर तातडीने तो वितरित केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या गणवेशाचा गेल्यावर्षी बोजवारा उडाला. राज्यस्तरावरून कापड खरेदी करून बचत गटांकडून गणवेशाची शिलाई करून घेण्याचे आदेश होते, मात्र एकाचवेळी शिलाई होऊ शकली नाही. परिणामी शाळा संपल्यानंतरही अनेकांना गणवेश मिळालाच नाही. मात्र यंदा शासनाने पुन्हा कापड खरेदी आणि गणवेश शिलाईचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले. प्रति विद्यार्थी गणवेशासाठी 300 रुपये व बूट- पायमोजांसाठी 170 रुपये, याप्रमाणे 3 कोटी 67 लाख 65 हजार रुपये शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले. पहिल्या गणवेशासाठी पंचायत समिती स्तरावर निधी वितरित करण्यात आला.
यंदा शालेय समितीमार्फत गणवेशाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 60 हजार विद्यार्थ्यांना पहिला गणवेश देण्यात आला आहे, तसेच या सर्व मुलांना बूट जोडी, पायमोजे देण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे बाकी आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल, दुसरा गणवेशही 15 ऑगस्टपर्यंत देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.