

Crocodile spotted Khed Ratnagiri
खेड: शहरातील कन्या शाळा परिसरात पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आलेली सुमारे ८ फूट लांबीची भलीमोठी मगर वनविभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या संयुक्त पथकाने पकडली. नंतर मगरीला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
खेड परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. यामुळे नदीतील मगर पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर पडून मानवी वस्तीकडे वळली. २० जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही मगर कन्या शाळेजवळ स्थानिक नागरिकांना दिसून आली. नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला.
वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सदस्य सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर, सुरज जाधव, सुमित म्हाप्रळकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वनपाल उदय भागवत, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, अशोक ढाकणे यांनी मगरीला सुरक्षितरीत्या पकडले.
या रेस्क्यूमध्ये खेड नगरपरिषद, अग्निशमन दल यांनीही सहकार्य केले. संपूर्ण मोहिम रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या तत्परतेचे व रेस्क्यू पथकाच्या शौर्याचे कौतुक केले. तसेच पावसाळ्यात वन्यजीव मानवी वस्तीत भटकण्याची शक्यता लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.