Ratnagiri BJP | रत्नागिरी: दापोलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवरून चर्चांना उधाण | पुढारी

Ratnagiri BJP | रत्नागिरी: दापोलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवरून चर्चांना उधाण

प्रवीण शिंदे

दापोली; फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करू नये. फांदी तुटली तर राम राम करण्याची वेळ येईल, अशा आशयाचे स्टेटस दापोलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसत आहेत. त्यामुळे दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांचा रोख नेमका कुणाकडे ? अशी चर्चा दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी होत आहे. Ratnagiri BJP

आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे, असा आशय देखील स्टेटसवर दिसत आहे. Ratnagiri BJP

दापोलीत आज (दि. ९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. दापोलीत विकास कामांचे भूमिपूजन ते करणार आहेत. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती आहे. मुख्यमंत्री युतीचे असल्याने तिन्ही पक्ष मुख्यमंत्री दौऱ्यात सहभागी होतील, असे वाटत असताना दापोलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्टेटस वरून ते या दौऱ्यात सहभागी होतील असे दिसत नाही. मात्र, अजित पवार यांची राष्ट्रवादी शिंदेंच्या दिमतीला दिसत आहे.

खासदार सुनील तटकरे हे दापोलीत दाखल झाले आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांवर टीका केली होती. तर आमदार योगेश कदम यांनी आमचे पदाधिकारी भाजप फोडत आहे. असे असेल तर याचा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर दापोलीत भाजप आणि शिवसेना अशी वादाची ठिणगी पडली आहे. सुनील तटकरे यांचे रायगड लोकसभा उमेदवारीबाबत देखील वरखाली असल्याने ती बाजू माजी मंत्री रामदास कदम यांनी उचलून धरली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी जवळीक वाढताना दिसत आहे. मात्र, भाजपचे दापोलीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी नाराज होताना दिसत आहेत. त्यामुळे दापोलीत या नाराजीचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा 

Back to top button