आपली प्रगती ज्यामध्ये आहे तेच करावं आणि न लाजता कामाला लागावं : नारायण राणे | पुढारी

आपली प्रगती ज्यामध्ये आहे तेच करावं आणि न लाजता कामाला लागावं : नारायण राणे

खेड; पुढारी वृत्तसेवा : आपली प्रगती ज्या व्यवसायात आहे तो निवडा आणि न लाजता कामाला लागा, असा सल्ला केंद्रीय लघु, माध्यम व सूक्ष्म उद्योग विकास मंत्री ना.नारायण राणे यांनी दिला. खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा लोटे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र महाराष्ट्र शासन, गोसेवा आयोग महाराष्ट्र प्रदेश, गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्य, समस्त महाजन परिवार ट्रस्ट, आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, लोकनेते ज्येष्ठ गोमक दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप साहेब (पिंपरी चिंचवड पुणे) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देशी गो मातेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय गो संमेलन २०२४ च्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी ना. राणे यांचा आयोजकांच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार केला.

खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा परिसरात दि. २६, २७ व २८ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय गो संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचा समारोप केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, माजी खा. निलेश राणे, गोसेवा आयोग राज्य अध्यक्ष शेखर मुंदडा, किशोर महाराज, कैलाश नंदा, विजय जगताप, संजय पांड्ये, संदीप प्रधान, भगवान कोकरे, आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. समारोप समारंभाचे प्रस्ताविक भगवान कोकरे यांनी केले. राज्य आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, माजी खा. निलेश राणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ना. राणे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ना. राणे म्हणाले, भगवान कोकरे हे एक हजार पेक्षा जास्त गाईच्या पालनाचे पवित्र कार्य करत असून धर्मात गाई ला मातेचे स्थान दिलेले आहे. आगामी काळात सिंधुदुर्गात देखील एक भव्य गोशाळा प्रकल्प उभा करत आहे. त्या माध्यमातून पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे गोशाळा आधारित लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग सुरू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात येणार आहे. गो शाळा म्हणजे केवळ गाई पाळणे नव्हे तर त्या माध्यमातून विविध वस्तूंची निर्मिती करून रोजगार निर्मिती होऊ शकते.

देशात ६० कोटी ४० लाख उद्योग असून त्यामध्ये मराठी टक्का कमी असल्याने परिस्थीत पाहून उदास वाटते. मराठी तरुण उद्योग करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. आम्ही सिंधुदुर्गात लघु उद्योगांना चालना दिल्यानेच दरडोई उत्पन्न ३६ हजार वरून २ लाख ४० हजार पर्यंत वाढ करण्यात गेल्या ३० वर्षात यशस्वी झालो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात देखील पायाभूत सुविधा निर्माण केल्यास उद्योगाला चालना मिळेल. लोटे येथे ज्या ठिकाणी हे संमेलन होत आहे त्या जागेचा प्रश्न गेले कित्येक वर्ष सुरू असला तरी ती पूर्णपणे सोडवण्यात येईल. परंतु हे पवित्र काम करताना कोणीही घाबरु नका. सरकार कडून गो शाळांना थेट आर्थिक मदत अपेक्षा करण्यापेक्षा अन्य राज्यांप्रमाणे गो शाळा विविध उत्पन्न निर्माण करणारे प्रकल्प सुरू करा त्यासाठी पूर्ण सहकार्य सरकार करेल. गो शाळा स्वयंपूर्ण बनल्या तर अनेकांना रोजगाराची देखील संघी त्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ जखमी, निराधार गाईंचे गो शाळे मार्फत संगोपन न करता ११०० निराधार गाई सोबत चांगले दूध देणाऱ्या किमान १०० गाई पाळल्यास त्या तुमच्या गो शाळेला नक्कीच आर्थिक सक्षम बवतील, असा विश्वास ना.राणे यांनी व्यक्त केला.

Back to top button