

लांजा; पुढारी वृत्तसेवा : लखनऊहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या ट्रेलरने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथे दोन पादचारी महिलांना चिरडले. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. पल्लवी प्रकाश पेंढारी (वय 47, रा. आंजणारी-पेंढारीवाडी) असे तिचे नाव आहे. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रेलर चालकाला देवधे येथे पकडण्यात आले. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंजणारी पेंढारीवाडी येथील दोन्ही महिला नेहमीप्रमाणे सकाळी शेतीच्या कामासाठी चालल्या होत्या. मुंबई-गोवा महामार्गावरून चालत जात असताना गोव्याच्या दिशेने जाणार्या भरधाव ट्रेलरने या दोघींना धडक दिली. टाटा प्राईमा (एच.आर.38 व्ही.8794) चा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दीन अन्सारी (वय 26, रा. तहसील चैनपूर, जि. कैमूर, बिहार) हा चालवत होता. या ट्रेलरच्या धडकेत पल्लवी प्रकाश पेंढारी (वय 47, रा. आंजणारी पेंढारीवाडी) या महिलेला जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडू पेंढारी (वय 55, रा. आंजणारी पेंढारीवाडी) ही गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच लांजाचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. हातखंबा वाहतूक पोलिस मदत केंद्राचे कर्मचारीदेखील या ठिकाणी दाखल झाले होते. पकडण्यात आलेल्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख करत आहेत.