Ratnagiri News : राजापुरात ४०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज सापडले!

छत्रपती राजाराम महाराजांचे आज्ञापत्र, रामचंद्रपंत अमात्यांचा पत्रव्यवहार; नाईक-सरदेसाई घराण्याच्या इतिहासावर नवा प्रकाश
Ratnagiri News
Published on: 
Updated on: 

राजापूर : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजापूरमधील नाईक-सरदेसाई घराण्याशी संबंधित इ.स. १६६८ ते १७६५-६६ या कालखंडातील दुर्मीळ ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध झाले आहेत. सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या या कागदपत्रांमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे आज्ञापत्र, रामचंद्रपंत अमात्य यांचा पत्रव्यवहार, जमीनवाटप, बागायती विकास, वतनहक्कांचे वाद आणि दत्तकविधानाच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे राजापूरसह दक्षिण कोकणच्या मध्ययुगीन प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक इतिहासाचे नवे पैलू उलगडण्याची शक्यता आहे.

राजापूर तालुक्यातील डोंगर येथील दीपक शेलार यांनी ही कागदपत्रे मंदिर व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना संशोधनासाठी उपलब्ध करून दिली. मोडी लिपीतील दस्तऐवजांचे वाचन नाशिक येथील शासनमान्य मोडी लिपी वाचक रामनाथ रावळ यांनी केले आहे.जमीन महसूल, बागायती विकासाचे धोरणसंग्रहातील सर्वांत जुना दस्तऐवज इ.स. १६६८ मधील असून, त्यात नरसोवा नाईक सरदेसाई यांना दिलेल्या कौलनाम्याचा समावेश आहे. पडिक जमिनी लागवडीखाली आणणे, नारळाच्या बागा विकसित करणे, ठराविक कालावधीनंतर महसूल भरणे अशा अटी त्यात नमूद आहेत. यावरून तत्कालीन राजसत्तेकडून शेती व बागायती विकासाला दिले जाणारे प्रोत्साहन स्पष्ट होते.

छत्रपती राजाराम महाराजांचे आज्ञापत्र इ.स. १६९४ मधील छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञापत्रात कान्होबा नाईक बिन नरसोवा नाईक यांच्या वतनहक्काचा उल्लेख आहे. सरदेसाई घराण्यातील वतनविभागणीवरून निर्माण झालेला वाद आणि प्रभावळी-संगमेश्वर परिसरातील सरदेशमुखी सेवेचा वारसाहक्क याबाबत छत्रपतींकडे दाद मागण्यात आली होती. स्थानिक वतनदारांच्या वादात राजसत्ता हस्तक्षेप करून न्यायनिवाडा करीत असल्याचे या पत्रावरून दिसते.इ.स. १७१० च्या सुमारास रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडून देवळे-देवरुख आणि मिठगवाणे परिसरातील अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला पत्रव्यवहारही संग्रहात आहे. नरसोवा, रंगोबा, गणोबा आणि कान्होबा नाईक यांच्यातील सरदेशमुखी हक्कांच्या वादाचा त्यात उल्लेख आहे.

इ.स. १७६५-६६ च्या सुमारास नरसोवा नाईक सरदेसाई यांच्या मृत्यूनंतर पुत्रसंतान नसल्याने पत्नी गोपिकाबाईंनी रामाजी नाईक यांना दत्तक घेतले. सरदेसाई वतनाचा वारसा कायम ठेवण्यासाठी त्यांनी विजयदुर्गचे सुभेदार कृष्णाजी विश्वनाथ यांच्याशी पत्रव्यवहार केला. या प्रक्रियेत धार्मिक आणि प्रशासकीय मान्यता मिळवण्याचे प्रयत्न झाल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट होते.याशिवाय मौजे डोंगर येथील खोतीव्यवस्था, बागांचे उत्पन्न, थकबाकी, दोन हजार रुपयांच्या देवाणघेवाणीचे हिशेब तसेच वेठबेगार आणि फारफर्मास यांसारख्या तत्कालीन सामाजिक-आर्थिक संज्ञांचे उल्लेखही या कागदपत्रांत आहेत. राजापूर, प्रभावळी, दाभोळ, संगमेश्वर व विजयदुर्ग इतिहासाच्या अभ्यासासाठी हा संग्रह महत्‍वपूर्ण आहे.

जुन्या सनदा, कौलनामे व मोडी पत्रव्यवहाराचे जतन व शास्त्रशुद्ध वाचन केल्यास कोकणच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल. राजापुरात सापडलेले हे दस्तऐवज मध्ययुगीन इतिहासाचे महत्त्वपूर्ण दुवे जोडण्यासाठी मोलाचे ठरतील.
-अनिल दुधाने, इतिहास संशोधक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.