

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातील कित्येक बसेस जुन्या झालेल्या होत्या. त्यामुळे दोन महिन्यात ४० बसेस भंगारात गेल्या आहेत. त्याजागी ४८ राजमाता जिजाऊ बसेस, ९० स्मार्ट लालपरी, शिवाई बसेस कोकणातील रस्त्यावर धावत आहेत.
सध्यातरी नव्या बसेसमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव येत आहे. एकंदरीत, काही बसेसची दुरवस्था असून त्याही स्क्रॅपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणखी १०० राजमाता जिजाऊ बसेसची मागणी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी विभागात काही महिन्यापूर्वी एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. गळक्या गाड्या, फुटलेल्या कांचाचा खिडक्या, मोडकी आसने अशा प्रकारची अवस्था लालपरीची झाली होती. त्यामुळे प्रवाशांमधून प्रचंड नाराजी पसरली होती. अखेर जिल्ह्यात नव्या ४८ राजमाता बसेस दाखल झाल्या आहेत. तसेच ९० स्मार्ट बसेस, ३५ ई-शिवाई, कोल्हापूरच्या ५ शिवाई बसेस रस्त्यावर धावत आहेत. अद्ययावत सुविधांच्या बसेसमुळे प्रवासीही जाम खूश झाले आहेत. उभे राहून प्रवास करण्याची संख्या हळूहळू कमी झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागातील काही बसेस खराब, नादुरुस्त आहेत. त्याही बसेस भंगारात जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासाठी आणखी १०० जिजाऊ बसेसची मागणी करण्यात आली आहे. आणखी नव्या बसेस लवकरात लवकर आल्यास खऱ्याअर्थाने प्रवाशांना अच्छे दिन येणार आहेत.
रत्नागिरी-कोल्हापूर प्रवास शिवाईमुळे आरामदायी
पर्यावरणपूरक ई-शिवाई बसेस सुरू झाल्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूरचा प्रवास आरामदायी होत आहे. एकूण ५ बसेस दररोज कोल्हापूर ते रत्नागिरी, रत्नागिरी-कोल्हापूर सुरू असून, प्रवाशांचा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ३४ ई-बसेस दापोलीत आल्या असून मुंबई, पुणेसह इतर ठिकाणचा प्रवास आरामदायी झाला आहे.