

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये डेंग्यू चे 256 रुग्ण आढळले होते .आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे या वर्षी हे प्रमाण कमी होऊन जानेवारी 2025 पासून 4 रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.संतोष यादव यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती मोहिम राबवण्यात आली.
दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांचे सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये ,तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. डेंग्यू दिनाच्या अनुषंगाने किटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचार्याना सूचना दिल्या आहेत.
डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. तो दुषित एडिस डासाची मादी चावल्याने त्याचा प्रसार होतो.डेंगीचा प्रसाराच्या नियंत्रणासाठी पाण्यातील एडिस डासाची अंडी, आळी, कोष व पुर्ण डास ही वाढ खंडीत केली तरच डेंगी या आजाराचा प्रसार नियंत्रित करता येईल, त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
किटकजन्य रोगावर प्रतिबंध करणेसाठी कार्यक्षेत्रातील डासांची संख्या कमी करणेकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे . प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील डासअळी घनता कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपला परीसर स्वच्छ ठेऊन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे. कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पीमासे सोडणे. पाणी साठवणुकीची भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करून आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे. गावामध्ये इको फ्रेंडली कार्यक्रमांतर्गत सर्व शौचालयाच्या व्हेंट पाईपला व आऊटलेटला जाळी बसवण्याचा कार्यक्रम घेणे. परीसरातील प्लास्टीक, टायर्स, भंगार साहित्य इ. निरुपयोगी साहित्यांची विल्हेवाट लावणे. तुंबलेली गटारे वाहती करणे व डबकी बुजवणे. या कार्यक्रमासाठी ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व पोषण समिती यांचे तिमाही सभेमध्ये जनजागृतीबाबत विशेष सुचना देण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे.
डासांच्या नियंत्रणासाठी ग्रामपंचयातीने गप्पी मासे पैदास केंद्रे तयार करणे . नियमित पाणी शुध्दीकरण करण्यात यावे. पाण्यामध्ये योग्य त्या प्रमाणात उत्तम प्रतिच्या टी. सी. एल. पावडरचा वापर करणे. ग्रामस्थांनी पाणी उकळूण गाळून पिणे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये टायर अथवा भंगार व्यावसायीकांनी स्वच्छता पाळणे तसेच पावसाचे पाणी साठू न देणेबाबत सुचित करणे. पावसाळयात डबक्यांमध्ये पाणी साठून तात्पुरती डासोत्पत्ती स्थाने निर्माण होतात.अशा ठिकाणी भर घालून संभावित डासोत्पत्ती स्थान नष्ट करणे अथवा गप्पी मासे सोडणे किंवा आळी नाशकाचा वापर करणे. संपुर्ण गावाचे सर्व्हेक्षण करुन पॅरा कन्टेनर (टायर्स, फुटकी माती, प्लॅस्टिक ची भांडी) यांची यादी करुन ग्रामपंचरायत मार्फत त्यांची विल्हेवाट लावणे. शासकीय इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, खाजगी दवाखाने, एस्टी डेपो, रेल्वे स्टेशन या ठिकाणाचे सर्व्हेक्षण करून डासोत्पती स्थाने आहेत का याची नियमित पडताळणी करणे. आदी सुचना करण्यात आल्या.