

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सहायक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक तसेच पोलिस शिपाई या संवर्गातील एकूण 258 पोलिस कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. यात आंतर जिल्हा बदल्या करण्यात आलेल्या 12 पोलिस कर्मचार्यांचाही समावेश आहे.
या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर आस्थापना मंडळ गठित करण्यात आले होते, ज्याचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे होते. तसेच सदस्य म्हणून अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व प्रभारी पोलिस उपअधिक्षक (मुख्यालय) रत्नागिरीच्या राधिका फडके तसेच सदस्य सचिव म्हणून प्रभारी कार्यालय अधिक्षक श्रध्दा तळेकर यांचा समावेश होता.
आस्थापना मंडळाचे अध्यक्ष व पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना वरील सहाय्यक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक तसेच पोलिस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या ह्या त्यांच्या समक्ष पारदर्शक तसेच समुपदेशनाव्दारे बदली करता दिलेल्या पसंती क्रमांकाचा प्रशासकीय दृष्ट्या विचार करुन बदलीबाबत आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार त्वरित प्रभावाने बदल्या केल्या.
यातील प्रशासकीय बदल्यांमध्ये सहाय्यक पोलिस फौजदार 30, पोलिस हवालदार 72, पोलिस नाईक 4, पोलिस शिपाई 113 तर चालक संवर्गातील बदल्यांमध्ये पोलिस हवालदार 15, पोलिस नाईक 1, पोलिस शिपाई 11 आणि अंतर जिल्हा बदल्यांमध्ये पोलिस हवालदार 1, पोलिस नाईक 2 व पोलिस शिपाई 9 अशा बदल्या करण्यात आल्या.