.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चिपळूण : पाच दिवसांच्या गौरी-गणपतीला चिपळूण शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. तालुक्यात 25 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशे, नाळ टाळ आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा गजर करत भक्तांनी गणरायाला निरोप दिला. विशेष म्हणजे पावसाने उघडीप दिल्याने या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. कोकणात घरगुती गणेशोत्सवाला प्राधान्य असते. प्रत्येक घरामध्ये गणेशमूर्तीची विधिवत पूजा केली जाते. याप्रमाणेच यंदाही तालुक्यात 25 हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यानंतर गौराईचेदेखील आगमन झाले होते. आता पाच दिवसांनंतर गौरीचा सण झाल्यावर गुरुवारी दुपारपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. चिपळूण शहर परिसरात व रामपूर ग्रामीण भागात 9 हजार 847, सावर्डे परिसरातील गावांत 9 हजार 332, तर अलोरे शिरगाव, पोफळी परिसरात 5 हजार 350 गणेशमूर्तींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.
चिपळूण शहर परिसरात बाजारपूल, मुरादपूर गोवळकोट, उक्ताड, गांधारेश्वर, बहादूरशेख पुलाजवळ, खेर्डी एमआयडीसी, पागमळा गुहागर बायपास रोड पूल, कोलेखाजण, पेठमाप, कापसाळ आदी भागात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील नद्या, नाले आणि विहिरीच्या किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भक्तांनी पारंपरिक वेष परिधान करून गणरायाचा गजर करीत बाप्पांना निरोप दिला. या वर्षी पारंपरिक वाद्ये मिरवणुकीत दिसली. ढोल-ताशे, सनई, नाल, टाळ, लेझीम आणि फुलांची उधळण करीत विसर्जन मिरवणुका निघाल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.