

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 10 जूनपर्यंत 19 हजार 523.55 मि.मी. म्हणजेच 64.48 टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर गतवर्षी याच महिन्यापर्यंत 29 हजार मि.मी. (95.98 टक्के) इतका पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 25 टक्के पर्जन्यमान कमी झाला आहे. जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला असून, काही तालुक्यात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची बरसात होते. पर्जन्यमान कमी झाले असले, तरी भात, नाचणीची लावणी पूर्ण झालेली आहे.
कोकणात मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यात हजेरी लावली. 8 दिवसांत जिल्ह्यात धो-धो पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने एन्ट्रीं केली. जून महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला तर जुलै महिन्यात काहीसा कमी झाला. दोन महिन्यांत पावसाने तुफान बॅटिंग केली. पावसामुळे 3 कोटींहून अधिक सार्वजनिक मालमत्ता, शेतीचे नुकसान, वीज पडून व्यक्तीचा मृत्यू, जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाच्या वतीने भरपाई देण्यास सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांत भात, नाचणीचे पुनर्लागवड पूर्ण केली असून, 95 टक्क्यांहून अधिक लागवड झाली आहे. जिल्ह्यातील, नद्या, धरणे फुल्ल झाली आहेत. एकंदरीत जून, जुलै महिन्यांत पावसाने दमदार बॅटिंग केली. तर ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिली असून एकंदरीत कोकणात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 25 टक्के पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून येते.
रत्नागिरी जिल्ह्याला 10 ऑगस्टबरोबरच 13 ऑगस्ट हे दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जळगाव, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धारशीव, लातूर, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना 13 ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात 2 हजार 539 मि.मी., चिपळूण तालुक्यात 2 हजार 488 मि.मी, राजापूर, लांजा तालुक्यांत 2 हजार 300 हून अधिक मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वात कमी गुहागर तालुक्यात 1 हजार 622 मि.मी, रत्नागिरी तालुक्यात 1 हजार 676 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.