

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा; मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे आज (शुक्रवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रकच्या भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, बावनदी स्टॉप नजिक आज (शुक्रवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रकचा अपघात झाला. ट्रक उतारावर होता. दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. हा ट्रक लोखंडी सळ्यांनी पूर्णपणे भरलेला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला व सर्व सामान या केबिनवर पडले होते. यामुळे आतमध्ये चालक व अन्य एकजण अडकले होते. लोखंडी सामान अंगावर पडल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस व ग्रामस्थांनी हे मृतदेह बाहेर काढले. या दोघांची नावे मात्र समजु शकली नाहीत. पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.