

देवरुख : हॉकी खेळाची आवड मराठी शाळेत शिकत असतानाच निर्माण झाली. मोठेपणी या खेळातच करिअर करत नावलौकिक मिळवायचा असे स्वप्न बाळगलेल्या मृण्मयी कुलकर्णीचे हे स्वप्न अधुरेच राहिले. कारण तब्बल दोन वर्षे मृण्मयी दुर्दम्य अशा आजाराचा सामना करत असताना नियतीने अखेर तिची ही झुंज अपयशी ठरवली आणि गुरुवारी रात्री मृण्मयीची ही झुंज अखेर नियतीपुढे हरली, मृण्मयीने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या चौदाव्या वर्षी मृण्मयी हे जग सोडून कायमची गेली.
शहरातील बागवाडी येथील पौराेहित योगेश कुलकर्णी यांची मृण्मयी ही सुकन्या. मृण्मयी ही लहानपणापासूनच अत्यंत हुशार व शालेय सर्व स्तरावरील उपक्रमात मोठ्या जिद्दीने सहभागी होणारी अशी शाळकरी मुलगी. जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये शिकत असताना मृण्मयीने हॉकीत सहभाग घेतला. अत्यंत मनापासून या खेळाचा ती सराव करत असे. अनेक तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येदेखील तिने सहभाग घेतला होता. नंतर सातवीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत ती दाखल झाली. शालेय जीवनात ती चित्रकला, नृत्य, खो-खो अशा स्पर्धांमध्ये ती सदैव सहभागी होऊन यशदेखील मिळवत असे. मृण्मयी अभ्यासातही हुशार होती. मृण्मयीचे बाबा यश या भावाला पौराहित्यातील रुद्र शिकवत असताना ते ऐकून मृण्मयीने रुद्र मुखोदगत केला होता. मृण्मयी अत्यंत सुस्वाभावी होती. ती लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांशीच खेळीमेळीने वावरत असे. यामुळे मृण्मयीने सगळ्यांनाच लहान वयात आपलेसे केले होते. परिसरातील सर्वच कार्यक्रमांमध्ये मृण्मयी सहभागी होत असे.
२०२४ या वर्षामध्ये तिची तब्येत काहीशी बिघडली. पोट दुखणे व पचनाचा त्रास अशा तिच्या आजाराला सुरुवात झाली. वैद्यकीय सर्व तपासण्या करत असतानाच तिच्या मेंदूला गाठ असल्याचे निष्पन्न झाले. ही गाठ काढण्याबाबतची शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व किचकट होती. असे असतानाही मृण्मयीने डॉक्टरांना धारिष्ट दाखवत शस्त्रक्रिया करा, मला बरे करा अशी हाक दिली.
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या समूहानेदेखील मृण्मयीच्या या भावनेला साथ देत अवघड अशी तब्बल १२ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी केली. कमी वयात झालेल्या या शस्त्रक्रियेला सामोरे जात लवकर बरी होणारी रुग्ण म्हणून मृण्मयीकडे पाहिले जात होते. याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातून अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या डॉक्टरांवर अभिनंदनचा वर्षावदेखील होत होता. या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यातच मृण्मयी पूर्वीसारखी झाली. शाळेतदेखील जाऊ लागली, अभ्यासात मग्न होऊ लागली हेदेखील कुठेतरी नियतीला मान्य नव्हते. तिला वर्षभरातच पाठदुखी व खांदा दुखी असे दुखणे सुरू झाले. या काळात मृण्मयीने आठवीची परीक्षादेखील यशस्वी केली. मृण्मयीच्या सुरु झालेल्या आजाराबाबत वैद्यकीय तपासण्या, पूर्वीचे परत उपचार याला सामोरे जावे लागले. मेंदूच्या गाठीतील काही जंतू मृण्मयीच्या मणक्यांमध्ये उतरल्याचे निष्पन्न झाले. हे जंतू कर्करोगाचे असल्याचे स्पष्ट झाले. यानुसार केमो, रेडिएशन अशा उपचार पद्धतीला मृण्मयी सामोरे जाऊ लागली. एकच ध्यास मला बरे व्हायचे आहे. यासाठी डॉक्टर जी उपचार पद्धती सांगतील त्याला मृण्मयी सकारात्मक प्रतिसाद देत होती.
असे असताना गेल्या दोन महिन्यांपासून तिचा हा आजार बळावत चालला. यातच तिची प्रकृती खालावत जात होती. दुर्दम्य अशा या आजाराला ती सतत झुंज देत होती. डॉक्टरही तिच्या या प्रतिसादाला सॅल्यूट करत होते. दोन वर्षांच्या आजारामध्ये सुमारे एक वर्ष ती रुग्णालयातच उपचार घेत होती. या उपचाराप्रसंगी तिचे आई-वडील, काका-काकू, भाऊ व चुलत बहिणी रुग्णालयामध्ये मृण्मयीला बळ देण्याचे काम करत होते. मात्र गुरुवारी रात्री मृण्मयीने या जगाचा निरोप घेतला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका-काकू व दोन बहिणी असा परिवार आहे.