

रत्नागिरी : एसटी बसेसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तसेच इतर कारणांमुळे काही प्रवासी विनातिकीट करीत असतात. आता विनातिकीट प्रवास करणार्यांविरोधात एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या वर्षभरात रत्नागिरी विभागात भरारी पथकाकडून बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 134 प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून अशा फुकट्या प्रवशांकडून तब्बल 35 हजार 111 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एसटीची सेवा ही शहराबरोबरच ग्रामीण लोकांची वरदायिनी मानली जाते. सध्या एसटीने विविध सवलत योजना आणल्या आहेत. शासनाने 75 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एसटी बसेसकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या जास्त असली तरी तरुण, तरुणींची संख्या वाढली आहे. याच एसटी बसेसमधून हजारो प्रवासी जिल्हा अंतर्गत, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा यासह विविध ठिकाणी प्रवास करीत असतात. वाट पाहिन पण एसटीनेच जाईन हे ब्रीदवाक्य जरी प्रचलीत असले तरी हे ब्रीदवाक्य प्रवास करताना पाळले जाते मात्र, प्रवास करताना विनातिकीट प्रवास करण्यांच्या संख्याही काय कमी नाही. यावेळी वाहक प्रत्येक प्रवाशांना तिकीट काढले आहे का विचारतात. अशामधूनही काही प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन तिकीट काढत नसतात
अशा विनातिकीट प्रवास करणार्यांविरोधात एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने भरारी पथकामार्फत वर्षभरात विविध मार्गावर एसटी बससेची तपासणी करण्यात आली. फुकटचा प्रवास करणार्या 134 प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणीमार्फत पकडण्यात आले. त्यांच्याकडून 35 हजार 111 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
एसटी बसेस ठराविक मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. अशा वेळी ज्या प्रवाशांचे ठिकाण आले आहे. ते तिकीट न काढताच उतरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहकाकडून तिकीट काढून घ्यावे, असे वारंवार प्रवाशांना सांगावे लागते. मात्र या गर्दीचा फायदा घेऊन लगेच आपल्या थांब्यावर उतरतात. अशांवर ही भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.