

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटाचे चौपदरीकरण करताना तीव्र उतारावर मात्रा न निघाल्याने हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. जिल्हा प्रशासनाने आता या ‘मृत्यूच्या सापळ्याला’ कायमस्वरूपी छेद देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. जीवघेणे वळण आणि तीव्र उतार कमी करण्यासाठी नवीन पुलाच्या वरच्या बाजूने १०० मीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे २१ कोटी रुपये खर्च येणार असून, सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने मुंबईत पाठवण्यात आला आहे.
अंजणारी घाटातील या तीव्र वळणावर गेल्या दोन महिन्यात एक दोन नाही तर तब्बल १२ अपघात झाले आहे. तरी देखील प्रशासनाकडुन ठोस उपाययोना करण्यात येत नव्हत्या. मात्र परवा रात्री पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाच्या झालेल्या अपघातानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ब्लॅक स्पॉट ठरलेला हे वळण आणि तीव्र उतार काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. सुमारे १७ कोटींचा हा प्रस्ताव होता. परंतु या अपघातानंतर तत्काळ या पूलाच्या कामाला मंजूरी घेण्यासाठी यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अंजणारी घाट सुमारे २ किमीचा आहे. यामध्ये आतापर्यंत सात गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यानंतर १०० लम्ब्लर बसवण्यात आले आहेत तरी अपघातावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने सूचवलेल्या पर्यायानुसार अंजणारीत वरच्या बाजूला सुमारे १०० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. तसा २१ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या सुधारित प्रस्तावाला मंजूरी मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियांता प्रस्ताव तत्काळ मंजूर व्हावा, यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली.