रत्नागिरी : केमिकल कंपनीची ९२ लाखांची फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रत्नागिरी : केमिकल कंपनीची ९२ लाखांची फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खेड, पुढारी वृत्तसेवा : लोटे येथील घरडा केमिकल कंपनीकडून खरेदी केलेल्या ऍग्रो केमिकल उत्पादनांचे ९२ लाख रुपये थकवणाऱ्या अशोक जैस्वाल (रा. खांडवा, मध्यप्रदेश) याला खेड पोलिसांनी इंदोर रेल्वे स्थानकावर सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी घरडा कंपनीने एप्रिल २०२२ मध्ये येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू करीत पोलीस संशयिताच्या मागावर होते. त्यासाठी खेड पोलीस मध्य प्रदेशमध्ये त्याच्या मागावर जाऊन आले. परंतु तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

अखेर खेड पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर अधिकारी हर्षद हिंगे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल विशाल धाडवे, सुनील पाडळकर असे पोलिसांचे पथक काही दिवसांपूर्वी पुन्हा मध्यप्रदेश मध्ये दाखल झाले. संशयीत अशोक जैस्वाल याचा शोध सुरू असतानाच पोलीसांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना अशोक जैस्वाल याचा मुलगा इंदोर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे संपर्क साधला मात्र, त्याने देखील पोलिसांची दिशाभूल केली. परंतु पोलीस इंदोर येथेच ठाण मांडून राहिले आणि अशोक जैस्वालच्या मुलाच्या हालचालीवर लक्ष ठेवत त्यांनी त्याचा मोबाईल नंबरची माहिती देखील मिळवली. यानंतर पोलिसांना यश आले. अशोक जैस्वाल हा इंदोर रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मोबाईलच्या माध्यमातून मिळताच त्यांनी इंदोर रेल्वे स्टेशनवर सापळा रचला व शुक्रवारी रात्री अशोक जैस्वाल रेल्वे स्टेशवर येताच ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news