

साडवली; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील राजीवली गावचे सरपंच व उपसरपंच या दोघांना ३० हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि. ११) सापळा रचून रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईने संगमेश्वर तालुक्यासह संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Ratnagiri Bribery Case)
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजीवली गावचे सरपंच प्रशांत प्रदिप शिर्के व उपसरपंच सचिन रमेश पाटोळे यांना ३० हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राचे वतीने सदर ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील पाखाडी तयार करणेचे काम त्यांनी केले होते. (Ratnagiri Bribery Case)
तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून राजीवलीचे सरपंच प्रशांत शिर्के व उपसरपंच सचिन पाटोळे यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. परंतु तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कमेपैकी १५ हजार रूपये सरपंच प्रशांत शिर्के यांनी व १५ हजार रूपये उपसरपंच सचिन पाटोळे यांनी गुरूवारी लाच घेतली. याचदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.