रत्नागिरी : फळांचा राजा अडचणीत; पंचनामे बासनात

रत्नागिरी : फळांचा राजा अडचणीत; पंचनामे बासनात

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा: बदलत्या वातावरणाने फळाचा राजा हापूसचा हंगाम अडचणीत आहे. त्यामुळे उत्पादनाला फटका निश्चित असताना कृषी विभागाने केलेले नुकसानाचे पंचनामे बासनात बांधून ठेवले आहेत. यावर्षी केवळ तीस टक्केच उत्पादन बागायतदारांच्या हाती येणार असल्याने कृषी विभागाचे पंचनामे केवळ विना भरपाईचा फार्स ठरण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पहिल्या टप्प्यात हापूस आंबा कलमांना आलेला मोहोर आणि बारीक कणीला मोठा फटका बसला होता. सलग डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर थंडी लांबल्यामुळे नव्याने पालवीही फुटली.

मोसमी पाऊस लांबल्यानंतर पुन्हा अवकाळीचा त्रास आंबा उत्पादकांना सहन करावा लागला. दिवाळीमध्ये थंडीऐवजी अवकाळी पावसाने थैमान घातले. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोर येण्याच्या परिस्थितीत असलेल्या हापूस कलमांना पालवी फुटू लागली. पाऊस लांबला तरीही 'ऑक्टोबर हिट'मुळे पालवी फुटलेल्या कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली होती.

वारंवार बदलणार्‍या प्रतिकूल हवामानाने हापूसचा हंगाम लांबणार असला तरी प्रत्यक्ष अद्याप सुरू होण्यातही अडथळे आहेत. मात्र, वातावरणाने आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान पाहणी करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी तालुक्यांना दिल्या होत्या.

त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात हा अहवाल कागदावरच ठेण्यात आला. त्यानंतर बागायतदरांनी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कलमांवर अतिरिक्त फवारण्यांचा खर्चही केला. मात्र, यंदाचा हंगाम ना फायद्याचा ना तोट्याचा ठरण्याची चिंता बागायतदारांना सतावते आहे.

नुकसानीचे पंचनामे म्हणजे केवळ कागदी घोडे ठरतात. या हंगामातही प्रशासनाने तशीच तयारी केली आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनाम्याचे अहवाल कागदावरच ठेवले. त्यामुळे नुकसानीपोटी मिळणारी भरपाईही अनिश्चितेच्या फवारणीत उडून जाण्याची शक्यता आहे. -अनिरुद्ध साळवी, बागायतदार, रत्नागिरी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news