रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर प्रथमच आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त जगप्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. दिवसभरात 70 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर भाविकांनी बीचवर फिरण्याचा आनंद घेतला.
गणपतीपुळे येथील गणेश मंदिर जगप्रसिद्ध आहे. अंगारकीनिमित्त येथे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली यांसह देशाच्या कानाकोपर्यातून भाविकांनी हजेरी लावली होती. मागील चार दिवस मोठ्या प्रमाणात भाविक येथे दाखल झाले. पहाटे 3.30 वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सायंकाळी काढण्यात आलेल्या पालखी प्रदक्षिणेत भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काही भाविकांनी समुद्रस्नानाचा आनंद लुटला. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतने 10 तर एमटीडीसीने 5 जीवरक्षकांची नेमणूक केली. देवस्थानद्वारे वॉच टॉवरवरून भाविकांनी माहिती देण्यात येत होती. तसेच सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात आली होती.
जेएसडब्ल्यू कंपनीकडून अग्निशमन यंत्रणा मंदिर परिसरात सज्ज ठेवण्यात आली होती. दर्शनासाठी दर्शन रांगेवर सावलीची व्यवस्था देवस्थानने केली आहे. पोलिस व ट्राफिक पोलिस यांनी पार्किंगची योग्य व्यवस्था केली. एमटीडीसीने सुरक्षेकरिता 5 वॉटर स्पोर्टस्च्या लोकांची नावे व संपर्क नंबर दिले होते. पोलिस विभागातर्फे 15 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. महावितरण विभागाकडूनही 24 तास अखंडित वीज उपलब्ध करण्यात आली.
तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार गोसावी यांची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. स्थानिकांसह जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही येथे विविध दुकाने थाटली होती.