राजापूर : महिलांच्या कौशल्याला मिळाली नवी ‘उमेद’ ; सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल

राजापूर : महिलांच्या कौशल्याला मिळाली नवी ‘उमेद’ ; सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानातर्गंत (उमेद) तालुक्यामध्ये 1 हजार 760 बचत गटांची स्थापना झाली आहे. याद्वारे 21 हजार महिला संघटित होऊन विविध छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करीत आहेत. यातून वर्षभरामध्ये सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. एकप्रकारे, या अभियानाच्या माध्यमातून बचतगटाद्वारे संघटित झालेल्या हजारो स्ञियांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळून त्यांच्यातील कौशल्याला नवे बळ मिळत आहे.

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात झाल्यानंतर राज्यामध्ये 'उमेद' या नावाने ही योजना ओळखली जात आहे. दि. 1 एप्रिल 2018 पासून राज्यात कार्यान्वित झालेल्या अभियानामध्ये महिलांना संघटीत करून सहकाराच्या धर्तीवर बचतगट गठीत केले जात आहेत. गरीब आणि जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे यादृष्टीने प्रयत्न करण्याचा उद्देश उमेद अभियानामध्ये ठेवण्यात आला आहे. या उमेद अभियानांतर्गंत तालुक्यामध्ये 1 हजार 760 बचत गटांची स्थापना झाली आहे. त्यातून, 21 हजार 120 महिला संघटीत होताना 231 हजार कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली आहेत.

सहकाराच्या धर्तीवर बचतगटाच्या माध्यमातून गठीत झालेल्या या महिलांनी हळद लागवड, चारसूत्री पद्धतीने सामूहिक भातशेती करणे यांसह दिवाळीचा फराळ तयार करणे, कुक्कुटपालन, भाजीपाला तयार करून विक्री यांसह घरगुती उत्पादने तयार करणे आदी व्यवसाय करीत आहेत. कोरोना महामारीमध्ये बचत गटाच्या महिलांनी मास्क तयार करून त्याची विक्री केली होती. त्यातून, लाखो रूपयांची उलाढाल झाली. यासाठी त्यांना तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, तालुका व्यवस्थापक अवधूत टाकवडे, अमित जोशी आदींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. तर, विविध बँकांनीही आर्थिकदृष्ट्या हातभार लावला आहे. या विविध व्यवसायांच्या माध्यमातून हे बचत गट वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल करीत आहेत. या उलाढालीच्या माध्यमातून या महिला एकमेकांच्या साथीने एकमेकींच्या कुटुंबांचा आर्थिक डोलारा उभा करण्यासाठी एकमेकींना सहकार्याचा हात देत आहेत.

यंदा आधुनिक पद्धतीने भातशेती केली जावी या उद्देशाने बचत गटांच्या माध्यमातून चारसूत्री लागवडीची कृषी विभागाच्या सहकार्याने प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.
– साक्षी वायंगणकर, राजापूर तालुका अभियान व्यवस्थापक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news