राजापूर; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर रेल्वेच्या धडकने मृत पावलेल्या जनावरांसंदर्भात असलेल्या नियमात बदल करण्यात यावा, किंवा रुळांवर जनावरे जाणार नाहीत या दृष्टीने ट्रॅकचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता राजापूर तालुक्यातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. ट्रॅकवर आजपर्यंत अनेक जनावारांचा मृत्यू झाला असून शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर रेल्वेने धडक देऊन जनावराचा मृत्यू झाल्यास जनावराच्या मालकाला जबाबदार धरले जात आहे. मुळात त्या मालकाचे नुकसान झाले असतानाही मालकांकडूनच दंड आकारला जात आहे. यामुळे शेतकरी असलेल्या मालकांचे फार मोठे नुकसान होत आहे. राजापूर तालुक्यात देवदिवाळी झाली की गुरे मोकाट सोडण्याची शेतकर्यांची परंपरा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे दिवदिवाळीनंतर गुरे राखण्याचे काम करीत नाहीत. त्यामुळे मोकाट असलेली गुरे ही ट्रॅकवर येतात. यामध्ये त्यांचा हकनाक बळी जात आहे. मुळातच तालुक्यातील काही ठिकाणी कोकण रेल्वेचे बंदिस्त ट्रॅक नाहीत. त्यामुळे ट्रॅकवर पडलेल्या शौचाच्या वासाने गुरे ट्रॅकवर जात आहेत. दरम्यान एखादी रेल्वे धावत असल्यास धडक होऊन त्या जनावराचा मृत्यू होतो. अशावेळी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी हसोळ लाडवाडी बोगद्याजवळ एकाच वेळी दुभत्या असलेल्या 12 म्हशी रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे संबंधित शेतकर्याचे सुमारे 7 ते 8 लाख रुपये नुकसान झाले. यावेळी कोकण रेल्वेच्या अजब नियमामुळे (दंड भरावा लागणार असल्याने) संबंधित शेतकरी पुढे आले नाहीत. त्यामुळे त्या म्हशी कोणाच्या या समजू शकल्या नाहीत. जर पंचनामा झाला असता तर निदान विमा व कोकण रेल्वेकडून तरी त्या शेतकर्याला नुकसान भरपाई मिळाली असती. कोकण रेल्वेच्या या नियमाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे अपघातात यापूर्वीही अनेक बैल व गायी मृत्यूमुखी पडले आहेत. अशा संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. कोकण रेल्वेने आपल्या नियमात बदल करून त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.