

कोल्हापूर : कोल्हापुरातून सकाळी साडेसात वाजता नवी मुंबईला जाण्यासाठी आणि नवी मुंबईहून सायंकाळी सात वाजता कोल्हापूरसाठी होणारी प्रस्तावित विमानसेवा लटकली आहे. कोल्हापूर विमानतळावर दुसर्या शिफ्टसाठी पुरेसे कर्मचारीच नसल्याने या सेवेला विलंब होत आहे. परिणामी, कोल्हापूरकरांचे मोठे नुकसान होत आहे.
नवी मुंबई विमानतळ नुकतेच सुरू झाले आहे. या विमानतळावरून कोल्हापूरसाठीही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सकाळ आणि सायंकाळी विमानसेवेची तयारी दर्शवली आहे. परिणामी, कोल्हापुरातून सकाळी साडे सात वाजता मुंबईला जाऊन दिवसभर काम आटोपून रात्री आठ वाजता कोल्हापूरकरांना परत येता येणार आहे. या विमानसेवेची प्रतीक्षा असताना ती आता कोल्हापूर विमानतळावरील पुरेशा कर्मचार्यांअभावी लटकणार असल्याचेच चित्र आहे.
कोल्हापूर विमानतळ सध्या सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यरत आहे. विमानतळावर एकाच शिफ्टमध्ये काम सुरू असले, तरीही सध्याच्या कर्मचार्यांना आठ तासांहूनही अधिक काळ काम करावे लागत आहे. त्यातच रात्री विमानसेवा सुरू झाली, तर आणखी कामाचा ताण वाढणार आहे. कंपनीच्या प्रस्तावानुसार सकाळी सहा वाजता नवी मुंबईहून टेक ऑफ घेणार्या फ्लाईटचे कोल्हापुरात सकाळी सात वाजता लँडिंग होईल, यानंतर सकाळी साडेसात वाजता मुंबईसाठी फ्लाईटचे टेकऑफ होईल. नवी मुंबईत तिचे साडेआठ वाजता लँडिंग होईल. सायंकाळी सात वाजता नवी मुंबईतून कोल्हापूरसाठी टेक ऑफ होईल, रात्री आठ वाजता कोल्हापुरात लँडिंग होईल आणि कोल्हापुरातून पुन्हा मुंबईसाठी रात्री साडेआठ वाजता टेक ऑफ होणार आहे. मात्र, याकरिता आवश्यक कर्मचारीच नसल्याने रात्री ऐवजी दुपारी चार अथवा सांयकाळी पाच वाजेपर्यंत प्लाईट मुंबईहून कोल्हापुरात येईल आणि साडेचार अथवा साडेपाच वाजता ती पुन्हा मुंबईला जाईल, असा शेड्यूलमध्ये बदल करण्याबाबत कंपनीकडे विचारणा सुरू आहे. अपुर्या कर्मचार्यांमुळे हा बदल केला असला, तरी सकाळी मुंबईत जाऊन परतण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागेल, अन्यथा अन्य मार्गे परतावे लागेल किंवा मुंबईत मुक्काम करावा लागेल. यामुळे हा बदल कोल्हापूरकरांसाठी फारसा फायदेशीर ठरणारा नाही.
नाईट लँडिंगचा पूर्णवेळ वापर होणार तरी कधी?
कोल्हापूर विमानतळावर नोव्हेंबर 2022 मध्ये नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली. ही सुविधा सुरू झाल्यानंतर विमानसेवा विस्तारतील अशी स्थिती होती. मात्र, तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी नाईट लँडिंग सुविधेचा प्रवासी विमान वाहतुकीसाठी अद्याप वापर सुरू झालेला नाही. तो कधी होणार, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.