चिपळूण: कोयना अवजल मुंबईकडे नेण्यासाठी सर्वेक्षण

चिपळूण: कोयना अवजल मुंबईकडे नेण्यासाठी सर्वेक्षण
Published on
Updated on

चिपळूण पुढारी वृत्तसेवा : वाशिष्ठीला मिळणारे कोयनेचे अवजल मुंबईला नेण्याबाबत अनेक दिवस विचार सुरू आहे. त्यासाठी राज्य शासनाने एका एजन्सीची नेमणूक देखील केली आहे. 19 कोटी रुपये खर्चातून ही एजन्सी या बाबत सर्वेक्षण करीत आहे. कोळकेवाडी धरणाच्या उत्तरेला म्हणजेच मुंबईच्या दिशेने हे अवजल कसे नेता येईल त्यावर अहवाल येणार आहे. परंतु हे पाणी नेताना प्रथम या पाण्यावर स्थानिकांचाच हक्क राहील असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ना. जयंत पाटील चिपळुणात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, चिपळूणच्या पुराला अतिवृष्टी हे महत्त्वाचे कारण आहे. अलिकडच्या काळात नैसर्गिक संकट कुठे व केव्हा येईल हे सांगता येत नाही. कोयनेच्या अवजलामुळे येथील पुरात वाढ झाली असाही एक सूर आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन करावे लागेल. या संदर्भात नुकतेच जलसंपदा खात्याने सादरीकरण केले आहे. कोयना अवजलाबाबत अनेक समित्यांनी अहवाल दिले.

आता राज्य शासन एजन्सीच्या माध्यमातून वाशिष्ठीचे खोरे व उत्तरेच्या दिशेने हे पाणी कसे नेता येईल याचे सर्वेक्षण करीत आहे. एका एजन्सीला हे काम देण्यात आले असून त्याचा लवकरच अहवाल येईल. परंतु या पाण्यावर सर्वप्रथम स्थानिकांचाच हक्क असेल. स्थानिकांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही. ज्याच्या जवळून हे पाणी जाते त्यालाच प्रथम प्राधान्य असेही ना. पाटील म्हणाले. पूरप्रश्न निकालात काढण्यासाठी अनेक कामे करावी लागतील.

ठिकठिकाणी संरक्षक भिंती या बरोबरच नदीपात्राचे खोलीकरण व रूंदीकरण होईल तेवढीच वाशिष्ठीची जलवहन क्षमता वाढेल. या शिवाय खोलीकरणाने पूररेषा कमी करणे हा महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. पूररेषा राज्य शासन रद्द करू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पूररेषा कमी करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात गाळ काढून घेेणे व जास्तीत जास्त काम करून घेणे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

ना. पाटील पुढे म्हणाले, चिपळूण आणि महाड येथील पूरप्रश्न निकाली काढण्यासाठी जलसंपदाने लक्ष वेधले आहे. 17 कोटीतून महाड आणि चिपळूणमध्ये चौदा पोकलेन व तीस टीपर घेण्यात आले आहेत. त्यामुळे महाडमध्ये देखील काम सुरू होत आहे. पावसाळ्यापर्यंत हे काम सुरू राहाणार आहे, असे सांगितले. यावेळी आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम आदी उपस्थित होते.

विरोधकांचा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळात देखील अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होईल यात कोणतीच शंका नाही. याचवेळी ना. जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा होणार्‍या गैरवापराबाबतही विरोधकांवर टीका केली.

सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यावर बोलताना ना. पाटील म्हणाले, नवरा, बायको, पाहुणे अशा बिरूदावल्या देणार्‍या षंढांबाबत काही बोलण्याची गरज नाही. कारण षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात असा निशाणा त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्यावर साधला. 'काश्मीर फाईल्स' चित्रपटावर ते म्हणाले, देशाच्या प्रमुखाने एखादा चित्रपट खांद्यावर घ्यावा, त्याचे मार्केटिंग करावे हे अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news