रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून 212 नागरिक दाखल | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून 212 नागरिक दाखल

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत असून आतापर्यंत 212 जण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यातील 114 जणांची पडताळणी अद्यापपर्यंत करण्यात आली आहे तर 51 जणांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली असून त्यात एकही नागरिक पॉझिटिव्ह आढळलेला नाही.

जिल्ह्यात येणार्‍या परदेशी नागरिकांवर आरोग्य यंत्रणेकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्यात डोंबिवली व पुण्यामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अधिक दक्षता घेतली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जि.प. उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध आठल्ये यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी परदेशी नागरिकांचा आढावा घेण्यात आला.

दि. 28 नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यात गेल्या 9 दिवसात मंडणगडमध्ये 10, दापोली 31, खेड 42, गुहागर 3, चिपळूण 47, संगमेश्वर 16, रत्नागिरी 56, लांजा 3 व राजापूर 4 असे 212 नागरिक परदेशातून आले आहेत. यातील 114 जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला. तर 51 नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये एकही परदेशी नागरिक कोरोनाबाधित सापडला नाही. ही जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे.

Back to top button