सिंधुदुर्गात मान्सून जोरधार; बळीराजा सुखावला; भात पेरणीच्या कामांना वेग

सिंधुदुर्गात मान्सून जोरधार; बळीराजा सुखावला; भात पेरणीच्या कामांना वेग

कणकवली : पुढारी वृत्तसेवा ; मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर शनिवारपासून सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय झाला आहे. शनिवार दुपारपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात मेघगर्जनेसह धुवाँधार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. भात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. धुवाँधार पावसामुळे भातशेतीचे वाफे पाण्याने भरून गेले आहेत. नदीनाले हळूहळू प्रवाहित होण्यास प्रारंभ झाला आहे. हवामान खात्यानेही पुढील दोन दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर तो सक्रिय कधी होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. गेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पाऊस वगळता उघडीप होती. यातच प्रादेशिक हवामान खात्याने सिंधुदुर्गात दोन दिवस यलो अलर्ट आणि ९ ते ११ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देत गडगडाटासह पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार शनिवारी दुपारपासून सिंधुदुर्गात जोरधार पावसास प्रारंभ झाला. मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशीपासून दमदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

शनिवारी दुपारी २.३० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत कणकवली तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू होती. ग्रामीण भागात याला मिरग मोहरला असेही म्हटले जाते. दमदार पावसामुळे शेतकऱ्याने भात पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आता यांत्रिक शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिल्याने शेतशिवारे पॉवर ट्रिलरच्या आवाजाने गजबजून गेली आहेत. तर ग्रामीण भागात काही प्रमाणात शेतकरी अद्यापही पारंपरिकपणे औत जुंपून शेती करताना दिसतात.

शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे ग्रामीण भागात भातशेतीचे वाफे पाण्याने तुडुंब भरले होते. तर नदीनाले देखील प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास नदीनाल्यांच्या साखळी तुटणार आहेत. त्यानंतर चढणीचे मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागात लगबग सुरू होणार आहे. यावर्षी वेळेत मान्सून दाखल होऊन सक्रीय झाल्याने बळीराजासह सारे सुखावले आहेत. ज्याठिकाणी काही प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे अशा वाड्यावस्त्यांनाही दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात आज रेड अलर्ट

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पावसाने जोर धरला असून ९ ते ११ जून या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत मच्छीमार आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छीद्र सुकटे यांनी केले आहे.

जिल्ह्यात शुक्रवारपासून मान्सूनने जोर धरला आहे. केरळ, गोव्याकडून सरकलेला मान्सून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापला आहे. हवामान खात्याने काल यलो अलर्ट जारी केला होता तर आज रेड अलर्ट जारी केला आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजेच्या कडकडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज दिला आहे. नागरिकांनी या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या आपत्ती परिस्थितीमध्ये जाऊ नये, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी केले आहे. १२ जूनपर्यंत जिल्ह्यात बहुतांशी भागात अत्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमाल व किमान हवामानामध्ये काही अंशाची घट होऊन ३३, ३५ व २६ ते २८ अंश सेल्सिअस इतके हवामान राहणार आहे. आद्रतेतील वाढीबरोबर वाऱ्याचा वेग वाढून हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.

दक्षिण कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये १२ ते १८ जून या कालावधीत पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या कालावधीत ११.१ मी एवढे सरासरी सरासरी पर्जन्यमान असते. यावर्षी या कालावधी दरम्यान ५.१ मी. पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. पडणारा मान्सून मृगनक्षत्र पर्जन्य पाऊस जिल्ह्यात सर्वच तालुक्यात व्यापला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news