Sindhudurg News : दोडामार्ग येथे काजू ‘बी’ दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको | पुढारी

Sindhudurg News : दोडामार्ग येथे काजू 'बी' दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

दोडामार्ग, पुढारी वृत्तसेवा : काजू ‘बी’ला प्रति किलो २०० रुपये हमीभाव मिळावा, यासाठी शासन दरबारी वारंवार मागणी करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आज (दि.१०) दोडामार्ग बाजारपेठेतील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले. त्यामुळे चौकातील चारही मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. काजू पिकाला शासनाने हमीभाव जाहीर न केल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धारही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला. Sindhudurg News

काजू “बी” ला प्रति किलो २०० रुपये हमीभाव शासनाने द्यावा अशी मागणी काजू व फळबागायतदार संघटना करत आहे. या मागणीसाठी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. मात्र, शासन स्तरावर कोणतीही हालचाल होताना दिसली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या या मागणीची लोकप्रतिनिधी सुध्दा दखल घेत नव्हते. काजू “बी” ला सध्या बाजारात ११५ ते १२० रुपये प्रति किलो दर आहे. शेतीला येणारा खर्च पाहता हा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही. Sindhudurg News

Sindhudurg News  आठवडा बाजार अन् रास्ता रोको

दोडामार्ग येथील श्री गणेश मंदिरात आज सकाळी तालुक्यासहित इतर तालुक्यातील शेतकरी एकवटले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी गणेश मंदिर ते दोडामार्ग मुख्य चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी “शेतकरी फळ बागायतदार संघाचा विजय असो”, “काजूला २०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे” यांसह इतर अनेक घोषणा दिल्या. हा मोर्चा येथील मुख्य चौकात आल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. आज दोडामार्गचा आठवडी बाजार असल्याने बाजारात येणाऱ्यांची पंचाईत झाली. वाहतुकीवरही याचा विपरित परिणाम झाला. चौकातून तिलारी, गोवा, सावंतवाडी व आयीच्या दिशेने जाणाऱ्या चारही प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी तिलारी व गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यायी मार्ग एकेरी वाहनांचा असल्याने तेथेही वाहनांची कोंडी झाली.

शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी

या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पणन मंत्री, कृषी मंत्री व शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी हमीभावासाठी बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसांत सरकारचा सकारात्मक निर्णय जाहीर होईल, असे पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सांगितल्याने शेतकऱ्यांनी अखेर त्यांचे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.

Sindhudurg News  महामार्गावर आंदोलन करणार

काजू “बी” ला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले जात आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोग हा लागू झालाच पाहिजे. सरकारने जर काजू “बी” ला हमीभाव दिला नाही, तर यापुढे गोवा-मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

अथवा निवडणुकीवर बहिष्कार

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजूला हमीभाव मिळेल, अशी आशा काजू उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, सरकारने कोठेही काजूचा उल्लेख न केल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. सरकारने आम्हा शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी व काजू “बी” ला २०० रुपये हमीभाव द्यावा. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर आम्ही बहिष्कार घालू, असा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button