मालवण : अवैध वाळू उत्खनन करणारे परप्रांतीय ११ कामगार ताब्यात | पुढारी

मालवण : अवैध वाळू उत्खनन करणारे परप्रांतीय ११ कामगार ताब्यात

मालवण; पुढारी वृत्तसेवा : कालावल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी आलेल्या 11 परप्रांतीय कामगारांना मालवण पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

तळाशील – तोंडवळी येथील कालावल खाडीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत दोन दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामस्थ, महिलांनी खाडीपात्रात उतरून उपोषण छेडले होते. जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्याचे तसेच कारवाईसाठी 24 तास पथक नियुक्त केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हेमंत पेडणेकर, सुशांत पवार यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी सोमवारी कालावल येथे धडक कारवाई करत 11 परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेतले. त्यांना येथील पोलिस ठाण्यात आणत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Back to top button