सिंधुदुर्ग: ट्रकच्या धडकेत तळेरे येथील तरुण ठार; वडील जखमी | पुढारी

सिंधुदुर्ग: ट्रकच्या धडकेत तळेरे येथील तरुण ठार; वडील जखमी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मुलगा ठार झाला. तर वडील जखमी झाले. ही घटना विजयदुर्ग तळेरे राज्य मार्गावर ओझरम फाटयानजीक सोमवारी (दि.१३) रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. अक्षय संतोष खानविलकर (वय २५,रा.तळेरे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संतोष अनंत खानविलकर (वय ५५, रा.तळेरे) असे जखमी वडिलांचे नाव आहे.

अपघाताची अधिक माहिती अशी की, तळेरे येथील पिठाची गिरणी चालक संतोष खानविलकर आणि अक्षय खानविलकर हे दोघे बापलेक दारूम येथून मोटारसायकलवरून तळेरे येथील घरी जात होते. यावेळी फणसगाव परिसरातून चिरे घेऊन फोंडाघाटच्या दिशेने ट्रक जात होता. या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारून ट्रक थांबविला. यावेळी मागून येणाऱ्या संतोष व अक्षय याच्या मोटारसायकलची ट्रकला जोरात धडक बसली.

अपघातानतंर ट्रक चालकाने ट्रक थांबून पळ काढला. दरम्यान अपघाताची माहिती स्थानिकांना मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना दाखल केले. यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

या अपघातात वडील संतोष यांना किरकोळ दुखापत झाली. अक्षय याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा  मृत्यू झाला. मृत अक्षय हा तळेरे परिसरात मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित होता. त्याच्या अपघाती निधनाची बातमी समजताच तळेरे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, वडील, आई, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. या अपघाताची फिर्याद काका संजय खानविलकर यांनी पोलिसांत दिली. अधिक तपास कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button