रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व ठिकाणचे सीसीटिव्ही फूटेज, साक्षीदार, मृत्यूपूर्व शरिरावरील जखमा शवविच्छेदन अहवालावरुन यात घातपात नसल्याचा निष्कर्ष पोलीस विभागाकडून काढण्यात आला आहे. परंतू निलिमाचा व्हिसेरा राखून ठेवलेला असून त्याचा अहवाल प्राधान्याने मिळाण्यासाठी पोलीस विभागाकडून लघु न्याय सहायक वैद्यानिक प्रयोग शाळेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येत्या चार दिवसात त्याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतरच निलिमाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दाभोळच्या खाडीत 1 ऑगस्ट 2023 रोजी निलिमाचा मृतदेह मिळून आला होता. त्यावेळी निलिमाच्या डोक्यावरील तसेच भुवयांवरील केस गळून गेलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आल्याप्रकरणी तपास करताना पोलिस विभागाने केईएम हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांशी चर्चा व माहिती घेतली आहे. त्यात मृतदेह 72 तास पाण्यात राहिल्यामुळे तो कुजण्याची तसेच त्याच्या डोक्यावरील केस गळून जाण्याची प्रक्रिया सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तिचे केशवपन झालेले नसल्याचे सिध्द होते. दरम्यान, निलिमासोबत हॉस्टेलमध्ये राहणार्या मैत्रिणी,कॉलेजच्या मैत्रिणी,नोकरीच्या ठिकाणचे वरिष्ठ व सहकारी, तिच्या प्रवासादरम्यान भेटणारे एसटी वाहक,स्थानिक मच्छिमार अशा एकूण 104 साक्षिदार तपासण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
तसेच निलीमाची बॅग आणि या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी जगबुडी नदीत 4 होड्या, 2 ड्रोन आणि 80 पोलिसांची 8 पथके तयार करण्यात आाली असून पोलीस तपास अजूनही सुरु असून साक्षिदारांकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.