रत्नागिरी: झोपडीत अभ्यास करून दोघे बनले ‘स्कॉलर’; गोठणे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश | पुढारी

रत्नागिरी: झोपडीत अभ्यास करून दोघे बनले ‘स्कॉलर’; गोठणे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

रत्नागिरी: दीपक कुवळेकर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि झोपडीत राहून संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुनर्वसनमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दिशा उंडे, शुभम घाग या दोघांनी पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत यश संपादन केले. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला. गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. शाळेचा निकालही १०० टक्के लागला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील तसेच जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गोठणे हे गाव चांदोली अभयारण्यात गेले आहे. या गावाचे पुनर्वसन काही वर्षांपूर्वी तालुक्यातील हातिव येथे करण्यात आले. मागील अनेक वर्षे पुनर्वसन झालेले असतानाही शासनाने त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अजूनही पक्की घरे बनवण्यात आलेली नाहीत. झोपडीतच ही कुटुंबे राहत आहेत. पक्की घरे नसल्यामुळे या कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शाळेतील शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने या मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत आहे. झोपडीत राहूनच संघर्ष करत या मुलांना अभ्यास करावा लागत आहे.

शाळेतील दिशा तुकाराम मुंडे व शुभम दीपक घाग यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रमेश जयराम शिवगण यांच्यासह मुख्याध्यापक रेश्मा यादव, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, युगंधरा सुर्वे, प्रज्ञा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

दरवर्षी 100 टक्के निकाल

या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक घरगुती अडचणींना सामना करावा लागत आहे. तरी शिक्षकांच्या मेहनतीमुळे शिष्यवृत्ती परिक्षेला गेले 5 वर्ष 100 टक्के निकाल लागत आहे. आत्तापर्यंत 6 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तसेच रत्नागिरी टॅलेन्ट सर्च, आमचा गणिताचा भास्कराचार्य, जाणू विज्ञान अनभवू विज्ञान या परिक्षेमध्येही विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

हेही वाचा 

Back to top button