चिपळूण : वाशिष्ठी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बेपत्ता; सहा जण सुखरुप | पुढारी

चिपळूण : वाशिष्ठी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बेपत्ता; सहा जण सुखरुप

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आठ मुले पोहण्यासाठी गेली होती. दरम्यान यातील डोहात दोघेजण बेपत्ता आहेत. तर इतर सहा जण सुदैवाने वाचले आहेत. चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी  या घटनेची माहिती दिली. उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आले होते. त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट, अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट, फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे (रा बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडी नाका चिपळूण), आतीक इरफान बेबल (रा बेबल मोहल्ला), अब्दुल कादीर नोशाद लासने (रा.जिव्हाळा सुपर बाझार) ही आठ मुले दुचाकी घेऊन फिरण्यासाठी गेले होते. यातील आतीक इरफान बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोघे बेपत्ता आहेत.

यावेळी शिरगाव येथील वजहर येथे पोहण्यासाठी थांबले. दरम्यान यावेळी पावसाची एक मोठी सर आली. त्यामुळे यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊन थांबले. तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली. सदरचा डोह हा 15 ते 20 फूट खोल आहेत. हे दोघे जण या डोहात बुडाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर याबाबतची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थ व पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चिपळूण डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनस्थळाला भेट देऊन पाहणी केली.

सदरचा पाण्याचा डोह हा खोल असल्यामुळे एनडीआरएफ पथक यांची मागणी करण्यात आली आहे. रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायत मार्फत रात्री याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल व अब्दुल कादिर लसणे हे दोघांचेही दहावीचे शिक्षण सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत.

Back to top button