रत्नागिरी : दापोलीतील पांगारीमध्ये एसटीची दुचाकीला धडक, एक जण ठार | पुढारी

रत्नागिरी : दापोलीतील पांगारीमध्ये एसटीची दुचाकीला धडक, एक जण ठार

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यामधील पांगारी महाकाळ वाडी येथे बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातत एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली. शनिवारी (दि. 22) सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मिलिंद महाकाळ (वय ४४) असे आहे, तर दिलीप महाकाळ हे गंभीर जखमी झाले.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद महाकाळ व दिलीप महाकाळ हे अक्षय तृतीया निमित्त गावातील ग्रामदैवताच्या मंदिरात सभेकरिता जात होते. अविनाश अण्णा गायकवाड (दापोली आगाराचे चालक) हे पांगारी कडून दापोलीकडे बस (एम एच 14 बी टी 2547) घेऊन येत होते. पांगारी महाकाळ वाडीनजीक चालकाने रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकला धडक दिली. या यामध्ये मिलिंद महाकाळ व दिलीप महाकाळ यांना गंभीर दुखापत झाली. या दोघांनाही तात्काळ उपचाराकरिता स्थानिकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मिलिंद महाकाळ मयत असल्याचे घोषित केले. दिलीप महाकाळ यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचाराकरिता सोनजे हॉस्पिटल जालगाव येथे पाठविण्यात आले.

याप्रकरणी चालक अविनाश गायकवाड यांच्या विरोधात तक्रार अमरेश कांबळे यांनी दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मयत मिलिंद हे महाकाळ वाडीच्या मंडळाचे सचिव होते. शनिवारी होणाऱ्या सभेमध्ये सर्व हिशोब मांडणी असल्यामुळे ते सभेकरिता निघालेले होते. त्यांच्या पश्चात ९ वर्षाची मुलगी ७ वर्षाचा मुलगा पत्नी व आई असा परिवार आहे. घरातील कमावता एकुलता एक आधार गेल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली. या प्रकरणाचा तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पड्याळ करीत आहेत.

Back to top button