परशूराम घाट २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दिवसा बंद; घाटातील चौपदरीकरण लागणार मार्गी | पुढारी

परशूराम घाट २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दिवसा बंद; घाटातील चौपदरीकरण लागणार मार्गी

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्वाच्या टप्प्यावर आले आहे. अजुनही ‘डेंजर झोन’मध्ये काम शिल्लक असल्याने २५ एप्रिल ते 10 मे कालावधीत परशुराम घाट वाहतूकीस बंद ठेवण्यात येणार आहे. दूपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व वाहतूक बंद ठेवून घाटात युद्ध पातळीवर काम केले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.

सध्या ५.४० किलोमीटरच्या परशुराम घाटातील बहुतांशी कॉक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे घाटातील या अंतरातील वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. उर्वरीत १.२० किलोमीटरच्या अंतरातील धोकादायक डोंगर उतार व दरडीमुळे हे काम अडचणीचे बनले आहे. त्यातच डोंगरच्या बाजूने २२ मीटर उंचीची भिंत असल्याने व त्यात मुरूमाची माती व भले मोठे दगड असल्याने वाहतूक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याची विनंती केली होती. अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्या नंतर परशूराम घाट बंद चा निर्णय घेण्यात आला आहे.

चिपळूण हद्दीतील बहुतांशी काम पुर्ण होत आले आहे. खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीचे काम अजुनही डेंजर झोनमध्ये शिल्लक आहे. त्यासाठी दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतूकीस बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार घाट बंद राहणार असून छोटी वाहने चिरणी , आंबडस मार्गे सोडण्यात येणार आहेत.

Back to top button