जागतिक वन दिन विशेष : जंगलतोडीने सह्याद्रीची होतेय ‘धूप’; प. घाटाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष | पुढारी

जागतिक वन दिन विशेष : जंगलतोडीने सह्याद्रीची होतेय ‘धूप’; प. घाटाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : पश्चिमेकडून येणारे मोसमी वारे ज्या पर्वतरांगांमुळे अडतात आणि त्यानंतर हे वारे उर्वरित महाराष्ट्रात जाऊन मोसमी पाऊस राज्यभर पसरतो तो सह्याद्री पर्वत आज उघडाबोडका झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. जागतिक ‘हॉटस्पॉट’ म्हणून कागदोपत्री जरी नोंद झाली असली तरी त्या द़ृष्टीने या पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी फारसे लक्ष दिले जात नाही. परिणामी या घाटात कायद्याला बगल देऊन मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. परिणामी, पावसाळ्यात धूप होऊन सह्याद्रीच्या पश्चिमेकडील नद्या, नाले व खाड्या गाळाने होरल्या आहेत. पर्यावरण व वन खात्याने या वृक्षतोडीची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने शासनाने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची गरज असून भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
सुमारे पाच हजार जातींच्या वनस्पती, हजारो औषधी वनस्पती, 129 जातींचे पशू, 508 प्रकारचे विविध पक्षी आणि 179 प्रकारचे जलचर

अशी जैवविविधता असलेला हा पश्चिम घाट आहे. सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होणारा हा पर्वत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यापर्यंत पसरला आहे. त्याचा ’इको सेन्सेटीव्ह झोन’ म्हणून समावेश झाला असला तरी तो फक्त कागदोपत्रीच आहे. आज राजरोसपणे पश्चिम घाटात अनेक ठिकाणी जंगलतोड होत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा उघड्याबोडक्या होत आहेत. तेथील वनसंपदा नष्ट पावत चालली आहे. अनेक प्राणी संपुष्टात येत आहेत तर प्राणी, पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत.

एकेकाळी वनराईने आच्छादलेले सह्याद्री पर्वत आता लाकूडतोड व्यापार्‍यांनी उघडा केला आहे. सह्याद्रीचे हिरवे रूप नष्ट झाले असून उघडे डोंगरकडे, कपार्‍या दिसत आहेत. सह्याद्रीच्या मातीचे आवरण नष्ट होत असून तीव्र उताराने ही माती नद्या, नाले व खाड्यात जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पूरप्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी माती उत्खनन, जंगलतोड, दगडांच्या खाणी देखील लावण्यात आल्या आहेत. या पट्ट्यात अभयारण्य असले तरी सह्याद्री पट्ट्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक संपत्तीवर झाला आहे. अन्य ठिकाणचे जंगलतोडीचे परवाने घेऊन सह्याद्रीच्या खोर्‍यात राजरोसपणे लाकूडतोड करण्यात येत आहे.

या बाबत अनेकांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकण्यात आला आणि जंगलतोडीविरोधात सुरू झालेले मिशन थांबले. आज कुंभार्ली घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात लाकूड भरलेले ट्रक जात आहेत. त्याला आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्न वन दिनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सह्याद्रीच्या खोर्‍यातील चिपळूण आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तोडलेले झाडांचे बुंधे या जंगलतोडीची साक्ष देत आहेत. वन विभागाने परवानगी दिलेले जंगल, त्यानंतर तोडलेली झाडे आणि त्या बदल्यात लाकूडतोड्यांकडून लावण्यात आलेली झाडे याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. एकीकडे ’झाडे लावा झाडे जगवा’, पाणी वाचवा, बंधारे बांधा अशा शासन योजना राबवित असताना दुसरीकडे मात्र सह्याद्री पट्ट्यातील होणारी जंगलतोड वन विभागाच्या दृष्टीस येत नाही? त्यामुळे हा जागतिक वन दिनाच्या निमित्ताने प्रश्न पडतो.

Back to top button