देवगड : साळशी येथे सापडले उभ्या दगडावरील कातळशिल्प | पुढारी

देवगड : साळशी येथे सापडले उभ्या दगडावरील कातळशिल्प

देवगड; पुढारी वृत्तसेवा : इतिहास मंडळाच्या संशोधकांना देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या दगडावरील दोन कातळशिल्पे सापडली आहेत. कोकणात अशाप्रकारे प्रथमच उभ्या दगडावरील पेट्राग्लिफ्स सापडली असल्याची माहिती पुरातत्व अभ्यासक रणजित हिर्लेेकर यांनी दिली.

देवगड तालुक्यातील इतिहास संशोधन मंडळाने गेल्या दोन वर्षात तालुक्यातील 15 ते 20 गावात शंभरच्या जवळपास नवीन कातळचित्रांचा शोध घेतला. साळशी येथील नैसर्गिक व्हाळा लगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकतेच सिमेंट-काँक्रिटचा बंधारा घालून धरण बांधण्यात आले. तेव्हा या भागातील वाढलेले जंगल तोडून साफसफाई करण्यात आली होती. धरणालगतच एक सुमारे पंधरा फूट उंचीचा मोठा दगड असून या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली आहे, असे वाटल्याने साळशी येथील मुकुंद भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य योगेश धुपकर यांना सांगितले.यानंतर इतिहास संशोधन मंडळाच्या टीमने प्रत्यक्ष 17 मार्च रोजी साळशी येथे मोहीम आयोजित केली. यावेळी या टीमला दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली. इथे या नैसर्गिक भव्य दगडावर
एका बाजूस दगड तासून सपाट केला आहे. त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत अशी माहिती हिर्लेकर यांनी दिली.

या कातळ चित्राविषयी माहिती सांगताना रणजित हिर्लेकर म्हणाले, आतापर्यंत गेल्या काही वर्षामध्ये रत्नागिरीपासून कुडाळ, वेंगुर्लापर्यंत दीड हजारांहून अधिक कातळचित्रे संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नातून उजेडात आली आहेत. ही सर्व कातळचित्रे जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. ही कातळचित्रे कोकणचे वैशिष्ट्य आहे. मात्र, अफगाणिस्तान, गांधार, काश्मीर या भागात जी कातळचित्रे आढळतात ती उभ्या दगडावर कोरलेली आढळतात. अशी उभ्या दगडावरील कातळचित्रे कोकणात आजवर कुठेही आढळले नाही. साळशी येथील उभ्या दगडावरील कातळचित्रे ही अशी दोन कातळचित्रे कोकणात प्रथमच सापडली. यामुळे साळशी येथील कातळचित्रे विशेष म्हणावी लागतील असे हिर्लेकर यांनी सांगितले.

या मोहिमेत रणजित हिर्लेकर यांच्यासमवेत इतिहास संशोधन मंडळाचे योगेश धुपकर व अजित टाककर हे सहभागी होते. साळशी येथे उभ्या दगडात सापडलेल्या कातळचित्रांमुळे देवगड तालुक्यातील कातळचित्रांच्या यादीत एक वेगळ्या वैशिष्टपूर्ण कातळचित्राची भर पडली आहे, असे हिर्लेकर यांनी म्हटले आहे.

Back to top button