रत्नागिरी : दोन वर्षात फुलवले ३७५ पीडित महिलांचे संसार | पुढारी

रत्नागिरी : दोन वर्षात फुलवले ३७५ पीडित महिलांचे संसार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी व अत्याचारग्रस्त महिलांचे हिंसेपासून तत्काळ संरक्षण होण्यासाठी एकाच छताखाली मानसिक आधार व समुपदेशन, कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शनासाठी रत्नागिरीत सुरू असलेले ‘सखी’ सेंटर महिलांना आधार ठरलेय. गेल्या 2 वर्षात आतापर्यंत एकूण 375 पीडित महिलांना लाभ देताना अगदी टोकाला गेलेल्या प्रकरणात ‘सखी’ने त्या दाम्पत्यांचे संसार पुन्हा फुलवले. आतापर्यंत 139 महिलांनी निवार्‍यासाठी धाव घेतली. समुपदेशनासाठी 189, पोलिस सहायतेसाठी 117 व कायदेविषयक सहाय्य 109 तर वैद्यकीय मदत लाभलेल्या 116 महिलांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

रत्नागिरीमध्ये 15 फेब्रुवारी 2021 रोजी सखी सेंटरचे औपचारिक उद्घाटन होऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली. ही योजना जिल्हा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत असून, संचलित म्हणून भाकर सेवा संस्था आहे. याचे काम व्यवस्थापन समिती पाहते. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव हे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आहेत.

पीडित महिलांना आधार देण्यासाठी व तत्काळ मदत होण्यासाठी 14 लोकांचा कर्मचारी वर्ग 24 तास कार्यरत आहेत. त्यामध्ये 1 केंद्रप्रशासक, 2 केस वर्कर, 1 समुपदेशक, 1 पॅरालिगल ऑफिसर, 1 पोलिस सुलभता अधिकारी, 2 पॅरामेडिकल ऑफिसर, 1 आयटी स्टाफ, 4 सुरक्षा रक्षक व 1 बहुद्देशीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली.

सखी सेंटर व तेथील कर्मचारी नेहमीच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. अत्याचारग्रस्त महिलांचे हिंसेपासून तत्काळ संरक्षण होण्यासाठी त्यांना एकाच छताखाली मानसिक आधार व समुपदेशन, कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन, तत्काळ वैद्यकीय सेवा, पोलिस सेवा तसेच पीडित महिलेस गरज भासल्यास 5 दिवस निवार्‍याची सोय इत्यादी सेवा आवश्यकतेनुसार मोफत पुरविल्या जातात. तसेच पीडितेसोबत सर्व वयोगटातील मुली व 6 वर्षापर्यंतचा मुलगा सेंटरमध्ये राहू शकतो.

सखी सेंटर येथे कोणत्याही वयोगटातील महिला, 18 वर्षाखालील बालिका तसेच बलात्कार पीडित, लैंगिक शोषण झालेली, हुंडा बळी, शारीरिक व मानसिक छळ झालेली, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, तसेच बालिका संरक्षण व मदत घेण्यासाठी सेंटरमध्ये येऊ शकतात. 18 वर्षाखालील बालिकांच्या बाबतीत वन स्टॉप सेंटर हे बालन्याय अधिनियम कायदा 2015 व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अंतर्गत कार्यरत सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवण्याचे काम करते.

ज्या पीडित महिलांना मदतीची गरज असेल त्यांनी सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरी, शासकीय अध्यापक महाविद्यालय आवार, आयडीयल शाळेसमोर, बोर्डिंग रोड, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सखी’ची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी

सखी सेंटर या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत रत्नागिरी जिह्यात 150 हून अधिक जनजागृती कार्यक्रम घेतले. शाळा, महाविद्यालये, झोपडपट्टी, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्रे, बाजारपेठा, महिला बचत गट, अशा ठिकाणी जाऊन सखीविषयी माहिती देत जनजागृती केली. पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती पदयात्रा काढण्यात आली व वृक्षलागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता करण्यात आली. स्वातंत्र्यदिनी शहरातील 75 ठिकाणी सखीची माहिती पत्रके वाटून जनजागृती केली. राष्ट्रीय पोस्टर मेकिंग स्पर्धेत रत्नागिरी सखीला देशपातळीवर द्वितीय क्रमांक मिळाला.

Back to top button