रत्नागिरीकरांना पाण्याचे नो टेन्शन! | पुढारी

रत्नागिरीकरांना पाण्याचे नो टेन्शन!

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणात 1.800 दशलक्ष घ. मी. पाणीसाठा आहे. शहरवासियांना दररोज 19 ते 20 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शीळ धरणात पावसाळा सुरू होईपर्यंतच्या जून महिन्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता 4.371 दशलक्ष घ. मी. इतकी आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना यंदा पाणीटंचाईची झळ भासणार नाही.

नवीन नळपाणी योजनेंतर्गत पाणीपुरवठा होण्यापूर्वी रत्नागिरी शहराला शीळ धरणासह पानवल धरण आणि नाचणे तलावातील पाण्याचा पुरवठा केला जात होता. वर्षभरापूर्वी नवीन नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पानवल धरण आणि नाचणे तलावातील पाणीपुरवठा करणे बंद करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचा भार शीळ धरणावर आला आहे.

आता या एकाच धरणातून संपूर्ण रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी पडलेल्या आणि लांबलेल्या पावसामुळे शीळ धरण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत ओसंडून वाहत होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने उष्णतेची लाट आली तरी बाष्पीभवनाने धरणातील पाणीसाठा कमी झाला तरी जून महिन्यापर्यंत रत्नागिरी शहरवासीयांना पाणीपुरवठ्याची चिंता नाही.

रत्नागिरी शहरात 10288 नळजोडण्या असून, प्रतिदिन 19 ते 20 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार शीळ धरणातील आताचा 1.800 दशलक्ष घ.मी. पाणीसाठा पाहता तो पावसाळा सुरू होऊन नियमित होईपर्यंत पुरू शकेल, असा विश्वास नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.

पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून आली तर त्यानुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येते. परंतु सध्या तशी परिस्थिती नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचे काम होणार पूर्ण

नवीन नळपाणी योजना वर्षभरापूर्वी कार्यान्वित झाल्यानंतर पानवल धरणातील पाणी पुरवठा करणे बंद करण्यात आले. या धरणाची साठवण क्षमता 5.11 दशलक्ष घ.मी. इतकी आहे. नाचणे तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहे. पानवल धरणाकडून येणार्‍या पाण्याचे शुद्धीकरण करणारे नाचणे जलशुद्धीकरण केंद्र नव्याने उभारले जात आहे. येत्या 3 महिन्यात या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर या धरणातील पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या धरणाकडून येणार्‍या पाणीपुरवठ्याची जुनी जलवाहिनी वापरून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button