रत्नागिरी : निवडणुकीच्या प्रतीक्षेत इच्छुक हवालदिल | पुढारी

रत्नागिरी : निवडणुकीच्या प्रतीक्षेत इच्छुक हवालदिल

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : नगरसेवकपदाच्या निवडणुका जाहीर होत नसल्याने रत्नागिरीतील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार हवालदील झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आणि भाजपचे माजी नगरसेवक तग धरून आहेत. आजही ते नगर परिषदेत येऊन लोकांची कामे करून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी आशा सोडून दिल्यासारखी आहे. या दोन्ही पक्षांचे माजी आणि इतर इच्छुक उमेदवारांनी ‘रनप’च्या कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवकांचा 5 वर्षांचा कालावधी गेल्या डिसेंबर महिन्यात संपुष्टात आला. सव्वा वर्ष झाले तरी सार्वत्रिक निवडणुका लागण्याचा पत्ता नाही. नगरसेवकांचा 5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर लवकरच निवडणुका लागतील, या आशेवर सर्वपक्षीय इच्छुक आणि माजी नगरसेवकांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यालयात येणे-जाणे चालू ठेवले. परंतु ,सव्वा वर्ष झाले तरी निवडणुका कधी लागणार याची खात्री नसल्याने उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार निराश झाल्यासारखे आहेत. रनपमध्ये त्यांचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी आशाच सोडल्यासारखी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेनेतील आणि भाजपच्या बहुसंख्य नगरसेवकांनी रनप कार्यालयात येऊन मतदारांची कामे करून घेणे चालू ठेवले आहे. राज्यात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. त्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील आ. उदय सामंत पालकमंत्री आहेत. भाजपच्या सर्वच पदाधिकार्‍यांना पालकमंत्र्यांशी संपर्कात राहून मतदारसंघात विकासकामे करून घेण्याचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे आदेश आहेत. त्यामुळे रनपमध्ये नगरसेवक नसले तरी शिवसेना – भाजपच्या माजी नगरसेवकांच्या मतदारसंघात विकासकामांचा ओघ सुरुच आहे. त्याचबरोबर मतदारांची वैयक्तिक पातळीवरील कामेही करून घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे या भाजप -सेनेच्या उमेदवारांचा संपर्क अजूनही कायम आहे.

काही प्रभागांत पोस्टर वॉर

भाजप – सेनेची एकीकडे युतीदर्शक कामगिरी सुरू असतानाच काही प्रभागांमध्ये या दोन पक्षांमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. युतीतील इच्छुक उमेदवारांचे ज्या प्रभागात मतभेद आहेत तेथे पोस्टर वॉर सुरू आहेत. या दोन्ही उमेदवारांचे स्वागत, शुभेच्छापर पोस्टर जवळजवळ लावलेले आहेत. अशा फलकांच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंपर्क कायम ठेवण्यासाठी गेल्या सव्वा वर्षापासून ही धडपड सुरू असतानाच निवडणुकांचा पत्ता नसल्याने ही मंडळी हवालदील झाली आहे

Back to top button