चिपळूण : काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राजीनामा | पुढारी

चिपळूण : काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राजीनामा

चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा ;  चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी बुधवारी (दि. १५) सकाळी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यांच्या राजीनाम्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली आहे. मात्र, काँग्रेस गोटातून या बाबत सुरू असलेल्या चर्चेनुसार काँग्रेसचे काही माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने नैतिक जबाबदारी म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर सर्वच पक्षात राजकीय अस्थिरता सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचे पडसादही चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिकारीदेखील आपल्या अस्तित्त्वासाठी पक्षांतराचे प्रयोग करीत आहेत. त्यातूनच नुकतीच काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी आपल्या काही सहकारी माजी नगरसेवकांसह व ठाकरे शिवसेना गटातील काही माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्याचे पडसाद काँग्रेस पक्षातही उमटू लागले आहेत.

हे माजी नगरसेवक काँग्रेस व शिवसेना सोडून राज्यातील सत्ताधारी गटात प्रवेश करणार याची शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, त्यांची समजूत काढण्याचे काम पक्षाच्या नेत्यांकडून केले नसल्याचे निदर्शनास आले. अशा या अस्थिर राजकीय वातावरणात आज उद्योजक व काँग्रेस तालुकाध्यक्ष यादव यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही काँग्रेस पक्ष सोडला नसल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत प्रशांत यादव यांचे काम करण्याचे कौशल्य लक्षात घेता शिंदे भाजप गटाकडून त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्याला यश आल्यास यादव यांना विधानसभा निवडणूक रिंगणात चिपळूणमधून उतरविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Back to top button