रत्नागिरी : खेड कोर्टाने कोट्यवधींच्या भंगार चोरीतील संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला | पुढारी

रत्नागिरी : खेड कोर्टाने कोट्यवधींच्या भंगार चोरीतील संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खेड; पुढारी वृत्तसेवा : खेड (जि. रत्नागिरी) तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील एका बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगाराची चोरी झाल्याचे प्रकरण घडले होते. यातील संशयित आरोपी ठाकरे गटातील नेत्यांवर आता अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ठाकरे गटाचे खेड तालुकाप्रमुख आणि लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, माजी पंचायत समिती सभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे व अंकुश काते या चौघा संशयितांवर भंगार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेड पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्याने चारही नेत्यांना पोलिसांकडून आता अटक केली जाण्याची शक्यता आहे. सध्या खेड पोलीस या चारही संशयित आरोपी असलेल्या नेत्यांचा शोध घेत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी लोटे एमआयडीसी येथील बंद पडलेल्या मिसाळ कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगाराची चोरी झाल्याचा प्रकार उघकीस आला होता.  शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली होती. या प्रकरणात एका स्थानिक युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या तपासात ठाकरे गटातील चार नेत्यांना या प्रकरणात संशयित आरोपी ठरविण्यात आले आहे.

Back to top button